Ganeshotsav E-Pass: गणेशोत्सवासाठी खासगी वाहनांना लागणारे ई-पास आता सहज उपलब्ध होणार; असा करा अर्ज
Ganeshotsav E-Pass (PC - Twitter)

Ganeshotsav E-Pass: गणेशोत्सवासाठी खासगी वाहनांना लागणारे ई-पास (E-Pass) आता सहज उपलब्ध होणार आहेत. यासंदर्भात राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आपल्या ट्विटवरून माहिती दिली आहे. गणेशोत्सवासाठी खासगी वाहनांनी जाणाऱ्या मुंबईतील नागरिकांनी https://mumbaipolice.co.in या लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा. तसेच मुंबई व्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्रातील नागरिकांनी https://covid19.mhpolice.in या लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा, असं आवाहनदेखील अनिल परब यांनी केलं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांची राज्य सरकारकडून योग्य खबरदारी घेतली जाणार आहे. गणेशोत्सवासाठी एसटीने येणाऱ्या चाकरमान्यांना ई-पासची गरज नसणार आहे. मात्र, इतर खासगी वाहनांना व अन्य मार्गांनी येणाऱ्या चाकरमान्यांना ई-पास घेवूनचं जिल्ह्यात यावे लागणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत दिली होती. याशिवय 10 दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीची अंमलबजावणी शासनाच्या गाइडलाइन्स हाती आल्यानंतर केली जाणार असल्याचेही त्यांनी म्हटलं होतं. (हेही वाचा - खुशखबर! गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या चाकरमान्यांसाठी विशेष रेल्वेला राज्य सरकारकडून हिरवा कंदिल)

यावर्शी राज्यावर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या मार्गात अनेक विघ्न येत आहेत. गणेशोत्सवासाठी ई- पास तसचे क्वारंटाइन राहावं लागणार असल्याने अनेकांची तारांबळ उडाली आहे.

अनिल परब यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांसाठी एसटी प्रशासनाने 3 हजार बसेची व्यवस्था केली आहे. तसेच, एसटीने जाणाऱ्या प्रवाश्यांना कोणत्याही प्रकारच्या इ-पासची आवश्यकता नसणार आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी ग्रुप बुकिंग केल्यास गावापर्यंत एसटी सोडण्याची सोयही राज्य सरकारने केली आहे.

विशेष म्हणजे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांकडून कोणतही भाडं आकारलं जाणार नाही. तसेच गावात गेल्यावर नागरिकांना 14 दिवसांचा क्वारंटाइन न राहता 10 दिवस क्वारंटाईन राहावं लागणार आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 12 ऑगस्टनंतर कोकणात जाणाऱ्यांची स्वॅब टेस्ट करण्यात येईल, असंही अनिल परब यांनी सांगितलं आहे.