Dongri Building Collapse (Photo Credits: Twitter/ ANI)

मुंबईच्या (Mumbai) डोंगरी (Dongri) भागातील केसरबाई (Kesarbai) ही सुमारे 100 वर्ष जुनी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने कारवाईचे पहिले पाऊल उचलले आहे. या दुर्घटनेप्रकरणी मुंबई महापालिका बी वॉर्डचे साहाय्यक आयुक्त विवेक राही यांचे निलंबन करण्यात आले आहे. (डोंगरी इमारत दुर्घटना प्रकरणात आमचा संबंध नाही, कोसळलेला भाग अनधिकृत: म्हाडा)

पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी या प्रकरणी सध्याच्या अधिकाऱ्यांवर कारवाई न करता तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला होता. तरी देखील मात्र सध्या कार्यरत असलेल्या सहाय्यक आयुक्तांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. (मुंबई: धोकादायक इमारतींचा क्लस्टर पद्धतीने पुनर्विकासासाठी कायदा करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस)

केसरबाई ही चार मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत तब्बल 14 जणांचा मृत्यू झाला. यात 7 पुरुष, 4 महिला आणि 3 मुलांचा समावेश आहे. तर 9 जण जखमी झाले आहेत. जखमींवर जे. जे. रुग्णालयत उपचार सुरु आहेत. या दुर्घटने प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना 50,000 रूपयांची मदत मिळेल. तसंच जखमींवरील उपचाराचा खर्च देखील शासनाकडून करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. (डोंगरी मधील दुर्घटनेप्रकरणी कसून चौकशी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश)

केसबाई ही इमारत 100 वर्षे जुनी असून यात 15 कुटंबे राहत होती. इमारत कोसळल्यानंतर  एनडीआरएफ आणि श्वानपथकाच्या मदतीने शोध आणि बचावकार्य पूर्ण करण्यात आले.