Mumbai Building Collapse Updates: डोंगरी मधील दुर्घटनेप्रकरणी कसून चौकशी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फोटो सौजन्य-ANI)

Mumbai Building Collapse Updates: मुंबईतील डोंगरी (Dongari) भागात आज (16 जुलै) सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला असून जवळजवळ 40 जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांनी दुर्घटनास्थळी भेट दिली असून या प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचसोबत संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर मदतसाठी काही उपाय केले जाणार असल्याचे ही फडणवीस यांनी म्हटले आहे.

केसरबाई नावाच्या चार मजली इमारतीचा निम्मा भाग कोसळून पडला. या घटनेची माहिती मिळताच बचाव कार्य तातडीने सुरु करण्यात आले आहे. परंतु ही 100 वर्ष जुनी इमारत म्हाडाची असल्याचे बोलले जात आहे. तर दुसऱ्या बाजूला इमारतीच्या विकासकामाकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याचे म्हटले जात आहे. परंतु फडणवीस यांनी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचे प्राण वाचवणे ही प्राथमिकता असल्याचे स्पष्ट केले आहे.(मुंबईतील डोंगरी येथे चार मजली इमारत कोसळली, 12 जणांचा मृत्यू)

अद्याप या ठिकाणी बचाव कार्य सुरु असून मानवी साखळीच्या मदतीने नागरिकांना मदत करण्यात येत आहे. त्याचसोबत या इमारतीत जवळजवळ 15 कुटुंबे राहत असल्याची माहिती देण्यात येत असून एका लहानग्या मुलाला सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे.