Terrorists | Image Used for Representational Purpose | (Photo Credits: ANI)

दहशतवाद्यांशी संपर्क (Terror Connection) ठेऊन त्यांना पैसे पुरवल्याच्या संशयावरुन औरंगाबाद (Aurangabad) येथील एका डॉक्टरला (Doctor) एटीएसने (ATS) ताब्यात घेतले आहे. अन्न आणि पाण्यातून विषबाधा (Food poisoning) करुन मोठा घातपात घडवून आणण्याच्या कटातही हा डॉक्टर सहभागी असल्याचा आरोप आहे. हा डॉक्टर औरंगाबाद येथे कार्यरत होता तसेच, त्याचे जम्मू काश्मीर (Jammu Kashmir) येथील दहशतवाद्यांशी संबंध होते, असा आरोप आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. परंतू, त्याचे नाव समजू शकले नाही. एबीपी माझाने याबात वृत्त दिले आहे.

प्राप्त माहितीनुसार, एटीएसकडून गेले दोन दिवस या डॉक्टरची कसून चौकशी सुरु आहे. भारतीय लष्कराच्या जवानांच्या भोजनावेळी अन्नात विष मिसळून घातपात घडवण्याचा कट पाकिस्तानात शिजला असल्याचा सुगावा भारतीय गुप्तचर विभागाला नुकताच लागला होता. हा कट पाकिस्तानी मिलिट्री इंटेलिजन्स (MI) आणि इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स (ISI) या संस्थांनी आखला असल्याची माहितीही गुप्तचर विभागाला मिळाली होती. त्यानंतर अलर्ट जारी करत शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. (हेही वाचा, बिकानेरमध्ये भारताच्या सुखोई 30 ने पाकिस्तानचे ड्रोन पाडले)

दरम्यान, जम्मू काश्मीर येथे कार्यरत असलेल्या सुरक्षा दलांना अलर्ट राहण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, जवानांचे जेवन बनवताना, त्यासाठी रेशन खरेदी करताना, भाज्या खरेदी करताना सावधगिरी बाळगण्यात यावी अशाही सूचना गुप्तचर विभागाने लष्कराला दिल्या आहेत. एमआय आणि आयएसआय एजंट काश्मीरमध्ये घातपात घडविण्याची योजना आखत असल्याची माहीत गुप्तचर विभागाला मिळाली आहे. पाकिस्तानी नंबरवरुन करण्यात आलेल्या चॅटच्या आधारे हा दावा करण्यात आल्याचे समजते.