WhatsApp Logo (Photo Credits: Pexels)

जगभरात सध्या करोना व्हायरसने (Coronavirus) आपली दहशत पसरवली आहे. चीनमध्ये जन्माला आलेल्या या विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. एकीकडे कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर, दुसरीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोनाबाबत खोट्या माहितीचा (Fake News) प्रसार मोठ्या प्रमाणात केला जात आहे. महत्वाचे म्हणजे, व्हाट्सअ‍ॅपवर (WhatsApp) अफवा (False Information) पसरवणारे चुकीचे मेसेज, फोटो, व्हिडीओ, पोस्ट पाठवल्या जात आहेत. या पार्श्वभीमीवर महाराष्ट्र सायबर सेलने सोशल मीडियासाठी विशेष मार्गदर्शिका जारी केला आहे. सर्व सोशल मीडिया विशेषत: व्हॉट्सऍपवरील सर्व ग्रुप, त्यांचे निर्माते, अ‍ॅडमिन आणि सदस्यांना याचे पालन करावे, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जग हतबल झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्यसरकारकडून अनेक उपाय योजना आखल्या जात आहेत.परंतु, काहीलोक सोशल मीडियाच्या माध्यामातून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, यापुढे कोरोना विषाणूसंदर्भात अफवा पसरवणे किंवा चुकीच्या माहितीचा सोशल मीडियामध्ये प्रसारित करणे, अशा प्रकारचे गुन्हेगारी कृत्य केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल. त्यांची गय केली जाणार नाही. त्यामुळे सर्व नागरिकांनी अशा प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यापासून अलिप्त राहावे, अशी सूचना महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना केली आहे. हे देखील वाचा- Sarkari Naukri: मुंबई महानगर पालिकेत 144 जागांसाठी वॉर्ड बॉयची भरती होणार; 17 एप्रिल पर्यंत mcgm.wardboy@mcgm.gov.in पाठवा अर्ज

व्हॉट्सऍप ग्रुप सदस्यांसाठी मार्गदर्शिका-

1) चुकीच्या/खोट्या बातम्या, द्वेष निर्माण करु शकणारी भाषणे आणि अशा प्रकारची माहिती ग्रुपवर पोस्ट करु नये.

2) आपल्या ग्रुपमधील अन्य कोणी सदस्याने अशी माहिती ग्रुपवर पाठवली तर आपण पुढे कुणालाही पाठवू नये.

3) आपण ग्रुपवर कोणतीही पोस्ट टाकल्यास आणि त्यावर ग्रुप अॅडमिन/अन्य सदस्यांनी आक्षेप घेतल्यास तात्काळ संबंधित पोस्ट ग्रुपवरुन आणि आपल्या मोबाईल फोनमधूनही डिलीट करावी.

4) तुम्हाला मिळणाऱ्या बातमीचा स्रोत आणि त्याची सत्यता पडताळूनच ती बातमी आवश्यक वाटल्यासच फॉरवर्ड करावी.

5) ग्रुपवर शेअर होणाऱ्या पोस्ट्सचे नियमितपणे परीक्षण करा.

6) परिस्थितीनुसार गरज पडल्यास ग्रुप सेटिंग बदलून only admin अशी करावी, जेणेकरुन अनावश्यक मेसेज ग्रुपवर टाळता येतील.

7) जर काही सदस्य सूचना देऊनसुद्धा आक्षेपार्ह पोस्ट्स टाकत असतील तर त्यांची तक्रार नजीकच्या पोलीस ठाण्यात करा.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवरही कारवाई केली जात आहे.