Disha Salian Nitesh Rane | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दिशा सालियान (Disha Salian) मृत्यूप्रकरणी नोटीस बजावली आहे. ज्यामध्ये त्यांना येत्या शुक्रवारी म्हणजेच 12 जुलै रोजी चौकशीस हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) याची माजी मॅनेजर दिशा सालियन 2020 मध्ये मृतावस्थेत आढळली होती. तिचा मृत्यू नव्हे तर मृत्यूपूर्वी तिची हत्या झाल्याचा दावा नितेश राणे यांनी अनेक वेळा जाहीररित्या दावा केला होता.

पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार- नितेश राणे

मुंबई पोलिसांच्या नोटीशीनुसार नितेश राणे यांनी मालवणी पोलीस ठाण्यात हजर राहणे आवश्यक आहे. जेथे त्यांची दिशा सालीयान मृत्यू प्रकरणी केलेल्या दाव्यांबाबत चौकशी केली जाईल. या प्रकरणात आपल्याकडे अनेक पुरावे आहेत. जे आपण पोलिसांनी मागितले तर त्यांना देऊ असे नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांपूढे बोलताना सांगितले होते. दरम्यान, पोलिसांनी पाठवलेले समन्स आपणास नुकतेच मिळाले आहे. मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे की हे हत्येचे प्रकरण आहे. मी मुंबई पोलीस विचारतील त्या सर्व प्रश्नांना उत्तरे देत सहकार्य करण्यास तयार आहे. एमव्हीए सरकारला कव्हरअप करून आदित्य ठाकरे यांना वाचवायचे होते. माझ्याकडे जी काही माहिती आहे, ती मी पोलिसांना देण्यास तयार आहे, असे राणे म्हणाले. राणे यांनी समन्स बजावल्यानंतर अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याच्या तयारीचा पुनरुच्चार केला. (हेही वाचा, SIT in Disha Salian's Death Case: दिशा सालियन मृत्यू प्रकरणी SIT स्थापन, राज्य सरकारकडून मुंबई पोलिसांना लेखी आदेश)

सुशांत सिंग राजपूत नंतर काहीच दिवसात दिशाचा मृत्यू

दिशा सालियन 8 जून 2020 रोजी मृतावस्थेत आढळून आली होती. ज्याच्या काही दिवस आधी सुशांत सिंग राजपूत त्याच्या मुंबईतील वांद्रे फ्लॅटमध्ये लटकलेला आढळला होता. गेल्या वर्षी, मुंबई पोलिसांनी सालियनच्या मृत्यूच्या तपासासाठी तीन सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले होते. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. (हेही वाचा - Aaditya Thackeray News: दिशा सॅलियन प्रकरण आणि SIT बाबत आदित्य ठाकरे यांचे प्रत्युत्तर 'भीतीतून बदनाम करण्याचे उद्योग')

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या आणि दिशा सालियान मृत्यू प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक काळ ढवळून टाकला होता. हा काळ कोविडदरम्यानचा सुरुवातीचा काळ होता. या प्रकरणात अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. काही प्रमाणात केंद्र विरुद्ध राज्य असा अप्रत्यक्ष संघर्षही पाहायला मिळाला. शिवाय, महाराष्ट्र पोलीस आणि बिहार पोलीस यांच्यातही हा संघर्ष झाल्याचे पाहायाल मिळाले. या प्रकरणात तत्कालीन सरकारमध्ये मंत्री असलेल्या आदित्य ठाकरे यांच्यावर नारायण राणे आणि नितेश राणे यांनी बेछुट आरोप केले. या प्रकरणाशी आदित्य ठाकरे यांचा संबंध असल्याचा पुनरुच्चार राणे यांनी अनेकदा केला आहे. दरम्यान, याच प्रकरणात आता नितेश राणे यांना समन्स आले आहे. पोलीस तपासात काय पुढे येते याबाबत उत्सुकता कायम आहे.