Gunratna Sadavarte: गुणरत्न सदावर्ते यांना धक्का, शिस्तभंग प्रकरणी वकिलीची सनद दोन वर्षांसाठी रद्द; बार कौन्सीलचा निर्णय
Gunratna Sadavarte | ( File Edited Image Used For Representational purpose Only)

महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने (Bar Council of Maharashtra & Goa) अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना जोरदार धक्का दिला आहे. गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद (Lawyer's Charter) दोन वर्षांसाठी रद्द करण्यात आली आहे. वकिली आचारसंहितेचे उल्लंघन केले प्रकरणी आणि वकिलांच्या गणवेशात असतानाही आंदोलानात सहभाग नोंदविल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. याचा परिणाम असा की, सदावर्ते यांना आता कोणत्याही कोर्टात पुढचे दोन वर्षे वकिली करता येणार नाही. म्हणजेच ते कोणाचीही बाजू कोर्टात मांडू शकणार नाहीत.

कोर्टात वकिली करणाऱ्या वकिलांसाठी विशिष्ट आचारसंहिता असते. या संहितेचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्यात येते. गुणरत्न सदावर्ते यांच्यावरही अशाच प्रकारचे उल्लंघन केल्याचा आरोप होता. या प्रकरणात सदावर्ते यांच्यावर बार कौन्सीलने शिस्तभंगाचा ठपका ठेवत कारवाई केली आहे.

अॅड. गुणरत्न सदावर्ते याच्याविरोधात एकूण दोन तक्रारी होत्या. त्यापैकी एका प्रकरणात मुंबई हायकोर्टाकडून ही सनद रद्द करण्यात आली तर दुसऱ्या प्रकरणात म्हणजेच ॲड.सुशिल मंचरकर प्रकरणात सदावर्ते यांची दोन वर्ष वकीली सनद रद्द करण्यात आली. (हेही वाचा, Silver Oak Attack Case: अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना जामीन मंजूर; शरद पवार निवासस्थान हल्ला प्रकरण)

ट्विट

गुणरत्न सदावर्ते हे महाराष्ट्रातील वकिली व्यवसायातील एक चर्चित आणि आक्रस्ताळे व्यक्तीमत्व म्हणून प्रसिद्ध आहेत. ते अनेक आशिलांचे, संघटनांचे खटले कोर्टात लढतात. परंतू, प्रसारमाध्यमांसमोर बोलताना ते अगदी भलत्याच पद्धतीने व्यक्त होतात. त्यांचे व्यक्त होण्याची पद्धत पाहून ते खरोखरच वकील आहेत का? असा प्रश्न अनेक नागरिक उपस्थित करतात. महाराष्ट्रामध्ये एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांनी केलेल्या अभूतपूर्व आंदोलनाचे कायदेशीर नेतृत्वही त्यांनी काही काळ केले होते. या वेळी त्यांच्या व्यक्तीमत्वचा जवळून परिचय राज्यातील जनतेला झाला.