पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे (DIG Nishikant More) यांनी अश्लील वर्तन आणि लैंगिक छळ (Sexual Abuse ) केल्याचा आरोप करुन गुन्हा दाखल करणारी 17 वर्षीय तरुणी राहत्या घरातून अचानक बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पीडित तरुणी ही सोमवारी (6 जानेवारी 2020) मध्यरात्रीच्या सुमारास घरातून निघून गेल्याचे वृत्त आहे. तसेच, पीडित तरुणीने आत्महत्या करण्याबाबतची चिठ्ठी (सुसाईड नोट) लिहिल्याचीही प्राथमिक माहिती आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी याबाबत तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
निशिकांत मोरे हे पुणे वाहतूक विभागात पोलीस उपमहानिरीक्षक पदावर काम करतात. मोरे यांनी एका तरुणीशी अश्लील वर्तन करत तिच्या चेहऱ्याला लावलेला केक चाटण्याचा प्रयत्न केला. तसेच, पीडितेला अवघडल्यासारखे वाटेल असे वर्तन केले, असा त्यांच्यावर आरोप आहे. प्राप्त माहितीनुसार हे प्रकरण जून 2019 मध्ये तळोजा परिसरात घडले होते. पोलीस दलात अगदी वरीष्ट पदावर कार्यरत असल्यामुळे निशिकांत मोरे यांच्या विरोधात कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप केला जात होता.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पीडित तरुणीचा 5 जून या दिवशी वाढदिवस होता. तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिच्या कुटुंबीयांनी घरातच बर्थडे पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीस वाहतूक विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक निशिंकात मोरे हेदेखील उपस्थित राहिले. (हेही वाचा, नवी मुंबईः 17 वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस उपमहानिरीक्षकावर POSCO अंतर्गत गुन्हा दाखल; वाचा सविस्तर)
एएनआय ट्विट
Maharashtra: FIR registered against Deputy Inspector General (Motor Transport, Pune) Nishikant More on charges of molestation and mistreatment of a minor girl. FIR registered in Navi Mumbai
— ANI (@ANI) December 26, 2019
उल्लेखनीय असे की, मोरे यांना या पार्टीचे निमंत्रण नव्हते. या पार्टीत मोरे यांनी तरुणीशी अश्लिल वर्तन करत तिच्या चेहऱ्याला लागलेला केक चाटण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे पीडितेला अगदीच अवघडल्यासारखे झाले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या घटनेबाबत पीडितेच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली. मात्र, मोरे हे पोलीस दलात वरिष्ठ अधिकारी असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप होता. अखेर समाजातील विविध स्तरातून दबाब वाढल्यानंतर पोलिसांनी मोरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.