Dharavi (Photo Credits: Wikimedia Commons)

अशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावी या अत्यंत दाटीवाटीच्या परिसराचा पुनर्विकास (Dharavi Redevelopment Project) करण्याचा राज्य सरकारचा मनोदय आहे. त्यासाठी राज्य सरकारने निविदा मागवल्या होत्या. त्यानुसार,महाराष्ट्राच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (Maharashtra's Slum Rehabilitation Authority) म्हणजेच एसआरएला (SRA) रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांकडून तीन निविदा प्राप्त झाल्या आहेत. यात अदानी समूह, नमन समूह आणि डीएलएफ कंपनीच्या निविदांचा समावेश आहे.

मुंबईतील सर्वात महत्त्वाकांक्षी नागरी नूतनीकरण आणि परिवर्तनशील उपक्रम म्हणून धारावी पुनिर्विकास प्रकल्प ओळखला जातो. हा प्रकल्प धारावीच्या 2.8 चौरस किलोमीटरवर पसरलेल्या विस्तीर्ण झोपडपट्टीचे एकात्मिक व्यावसायिक आणि निवासी टाउनशिपमध्ये रूपांतरित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस व्ही आर श्रीनिवास यांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईचा कायापालट करण्याच्या उद्दिष्टाच्या दिशेने सुरुवातीच्या टप्प्यांचा एक भाग म्हणून आम्ही काही निवीदा मागवल्या होत्या. या निविदांना प्रतिसाद देत तीन कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे. त्यांच्याकडून आम्हाला कोटेशन मिळाले आहे, असे श्रीनिवास म्हणाले.

श्रीनिवास यांनी पुढे सांगितले की, आलेल्या निवदांच्या प्रस्तावाची या महिन्याच्या (नोव्हेंबर) अखेरीस आम्ही छाननी करु. तसेच, पात्र निविदांचा विचार करु. कंपन्यांची नावे आणि त्यांच्या बोलीची रक्कम उघड करण्यासाठी आज (16 नोव्हेंबर) बोली उघडली जाणे अपेक्षित होते. त्यानंतर तांत्रिक आणि आर्थिक पात्रतेच्या आधारे निविदांची छाननी केली जाार आहे.