Dharavi Model: 'धारावी मॉडेल' ने जगाला दाखवला कोरोना विषाणूशी लढण्याचा मार्ग; WHO नंतर आता जागतिक बँकेनेही केलं कौतुक
Dharavi (Photo Credits: Wikimedia Commons)

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी (The Largest Slum In Asia) अशी ओळख असणाऱ्या धारावीमध्ये (Dharavi) सुरुवातीला कारोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. धारावी हे ठिकाण कोरोनाचं हॉटस्पॉट बनलं होतं. मात्र, राज्य सरकारच्या धारावी मॉडेलमुळे या ठिकाणच्या कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली. त्यामुळे 'धारावी मॉडेल' (Dharavi Model) जगभरात प्रसिद्ध झाले. धारावीत कोरोना संक्रमण कमी झाल्याने जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील (WHO) धारावी मॉडेलचं कौतुक केलं. याशिवाय आता जागतिक बँकेनेदेखील (World Bank) मुंबईतील धारावी येथे कोरोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी घेतलेल्या उपायांचे कौतुक केले आहे.

जागतिक बँकेने म्हटलं आहे की, धारावीतील कोरोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यात धारावीतील नागरिकांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या सहभागामुळे येथील कोरोना समस्येचे निराकरणं शक्य झालं. जागतिक बँकेने आपल्या द्वैवार्षिक अहवालात म्हटलं आहे की, धारावीत मे महिन्यात कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण सर्वाधिक होते. मात्र, योग्य उपाययोजनांमुळे हे प्रमाण 3 महिन्यांनंतर जुलैमध्ये 20 टक्क्यांपर्यंत खाली आले. (हेही वाचा - Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 2,848 रुग्णांची नोंद; एकूण एकूण संक्रमितांची संख्या 2,19,938 वर)

दरम्यान, 'दारिद्र्य आणि सामायिक समृद्धि' नावाच्या अहवालात जागतिक बँकेने म्हटलं आहे की, धारावीतील ताप आणि ऑक्सिजनची पातळी कमी होणाऱ्या रूग्णांची मोठ्या प्रमाणात तपासणी करण्याची रणनीतीचा एक भाग म्हणून मुंबईतील अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. या तपासणी मोहिमेमध्ये लोकांना सामील केले. या मोहिमेत खासगी रुग्णालयातील कर्मचारीही तैनात करण्यात आले होते. ज्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबवणं शक्य झालं. (हेही वाचा - Covid-19 Vaccine: आता कोरोना विषाणू लस बनवण्याच्या शर्यतीमध्ये Reliance ची उडी; जाणून घ्या कधी सुरु होणार ट्रायल)

धारावी ही जगातील सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक आहे. धारावी सुमारे अडीच किलोमीटर क्षेत्र व्यापते. धारावी येथे सुमारे आठ लाख लोक राहतात. 11 मार्च रोजी मुंबईत कोरोना संसर्गाचे पहिले प्रकरण समोर आले होते. तर धारावीमध्ये 1 एप्रिलला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर काही दिवसांतचं धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली. मात्र, येथील नागरिकांसाठी 'धारावी मॉडेल' वरदान ठरले.