Dhananjay Munde Allegation Case: सावध झालो नसतो तर माझाही धनंजय मुंडे झाला असता, मनसे नेते मनिष धुरी यांचा गौप्यस्फोट; 'त्या' महिलेवर ब्लॅकमेलिंगचा आरोप
Dhananjay Munde

Dhananjay Munde Allegation Case Updates: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला. त्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले. आता मात्र या प्रकरणाने धक्कादायक वळण घेतले आहे. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेने भाजप नेते कृष्णा हेगडे ( Krishna Hegde) तसेच मनसे नेते मनीष धुरी (Manish Dhuri) यांनाही ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता असा आरोप होत आहे. मनसे नेते मनीष धुरी यांनी स्वत: या आरोपाला दुजोरा दिला आहे. तसेच, सावध झालो नसतो तर माझाही धनंजय मुंडे झाला असता, असेही धुरी यांनी म्हटले आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या 'त्या' महिलेबाबत बोलताना मनसे नेते मनीष धुरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, त्या महिलेने धुरी यांचा फोन नंबर मिळवला. ती महिला धुरी यांना सातत्याने संपर्क करण्याचा प्रयत्न करत असे. तसेच, त्यांच्यासोबत ती गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करे. फोन आणि मेसेजद्वारे ती त्यांच्याशी संपर्क वाढवू पाहात असे. त्या महिलेने तिच्या बहिणीला आपल्याला भेटायचे आहे असे सांगून धुरी यांना एकदा एका खोलीतही नेले होते. परंतू, आपल्याला वेळीच तिच्या वर्तनाची कल्पना आल्याने आपण तिथून निघून गेले. तसेच, तिचा पिच्छा सोडविण्याचा प्रयत्न केला असे धुरी यांनी सांगितले. (हेही वाचा, Shocking Turn in Dhananjay Munde Allegation Case: धनंजय मुंडे प्रकरणात धक्कादायक वळण; आरोप करणाऱ्या महिलेविरोधात भाजप नेते कृष्णा हेगडे यांची पोलिसांत तक्रार)

कृष्णा हेगडे यांची प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांद्वारे पाहिल्यानंतर आपण त्यांना फोन केला होता. तेव्हा या महिलेने त्यांच्यासोबतही असा प्रकार केल्याचे आपल्याला समजले. त्यामुळे आता आपणही एक प्राथमिक तक्रार पोलिसांत देणार असल्याचे धुरी यांनी सांगितले. खरेतर ती महिला माझ्या संपर्कात येण्याचा प्रयत्न करत होती त्या काळात मी पक्षाच्या पदावर होतो. तसेच, माझा पक्षही नवीन होता. आम्हााल आमची वाटचाल करायची होती. त्यामुळे तेव्हा या गोष्टींकडे मी फार लक्ष दिले नाही. परंतू, आता या प्रकरणात आपण एक तक्रार द्यावी असे मला वाटत आहे, असे धुरी म्हणाले.

दरम्यान, भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, धनंजय मुंडे यांचा आणि आपला काहीच संबंध नाही. परंतू, एखाद्या व्यक्तीला टार्गेट केले जात असेल तर त्याविरोधात पुढे आले पाहिजे. संबंधित महिलेने मलाच नव्हे तर मनसे नेते मनिष धुरी यांनाही ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता. स्वत: मनिष धुरी यांनीच आपल्याला फोनद्वारे ही माहिती दिल्याचेही कृष्णा हेगडे यांनी या वेळी सांगितले.