Development Projects in Maharashtra: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज महाराष्ट्रात सुमारे 7600 कोटी रुपयांहून जास्त मूल्याच्या विविध विकास प्रकल्पांची दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पायाभरणी केली. या प्रकल्पांमध्ये नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नूतनीकरण प्रकल्पाची पायाभरणी आणि शिर्डी विमानतळावरील नव्या एकात्मिक टर्मिनल इमारतीची पायाभरणी यांचा समावेश होता. महाराष्ट्रातील 10 सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि इंडियन इन्स्टीट्युट ऑफ स्कील्स (IIS), मुंबई आणि विद्या समीक्षा केंद्र, महाराष्ट्र (VSK) यांचे उद्घाटनही त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान म्हणाले की महाराष्ट्राला 10 नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि नागपूर विमानतळाचे आधुनिकीकरण आणि विस्तार तसेच शिर्डी विमानतळावरील नव्या एकात्मिक टर्मिनल इमारतीची उभारणी या प्रकल्पांसह महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची भेट दिली जात आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे आजच्या विकास प्रकल्पांसाठी अभिनंदन केले.
गेल्या 10 वर्षांत सरकारने देशाच्या विकासासाठी आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा ‘महायज्ञ’ सुरू आहे असे पंतप्रधान म्हणाले. ‘आज आपण केवळ इमारती बांधत नाही तर निरोगी आणि समृद्ध महाराष्ट्राचा पाया रचत आहोत’, असे सांगत त्यांनी लाखो लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी राज्यात 10 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन करण्यात आल्याचे नमूद केले. ठाणे, अंबरनाथ, मुंबई, नाशिक, जालना, बुलढाणा, हिंगोली, वाशीम, अमरावती, भांकदरा आणि गडचिरोली हे जिल्हे लाखो लोकांसाठी सेवेची केंद्रे बनतील असे ते म्हणाले.
भारताच्या समृद्ध भूतकाळाकडून प्रेरणा घेऊन उज्ज्वल भविष्य घडवण्याचा मानस व्यक्त करत पंतप्रधानांनी शिर्डी विमानतळ परिसरात नवीन टर्मिनल, नागपूर विमानतळाचे आधुनिकीकरण यांसह महाराष्ट्रात सुरु असलेल्या इतर महत्त्वाच्या प्रकल्पांचा उल्लेख केला. पंतप्रधानांनी नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुमारे 7000 कोटी रुपये खर्चाच्या आधुनिकीकरण प्रकल्पाची पायाभरणी केली. हा प्रकल्प उत्पादन, विमान वाहतूक, पर्यटन, लॉजिस्टिक आणि आरोग्यसेवा यासह अनेक क्षेत्रांच्या विकासाला चालना देईल, आणि नागपूर शहर आणि विदर्भाच्या विस्तृत प्रदेशाला त्याचा लाभ मिळेल.
पंतप्रधानांनी शिर्डी विमानतळावर 645 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीची पायाभरणी केली. या प्रकल्पामुळे शिर्डी येथे येणाऱ्या भाविकांना जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध होतील. प्रस्तावित टर्मिनलच्या बांधकामाची संकल्पना साई बाबा यांच्या अध्यात्मिक कडुनिंबाच्या झाडावर आधारित आहे. (हेही वाचा: Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्षे सुरु राहणार; उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा)
भारताला, ‘जगाची कौशल्याची राजधानी’ म्हणून प्रस्थापित करण्याच्या आपल्या दृष्टीकोनाला अनुसरून, पंतप्रधानांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स (IIS) मुंबई, अर्थात भारतीय कौशल्य संस्थेचे उद्घाटनही केले. उद्योग क्षेत्रासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अद्ययावत प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी तयार करणे, हे याचे उद्दिष्ट आहे. पंतप्रधानांनी यावेळी महाराष्ट्राच्या विद्या समीक्षा केंद्राचे (VSK) उद्घाटन केले. विद्या समीक्षा केंद्र, विद्यार्थी, शिक्षक आणि प्रशासकांना स्मार्ट उपस्थिती, स्वाध्याय यांसारख्या थेट चॅटबॉट्सद्वारे महत्वाचा शैक्षणिक आणि प्रशासकीय डेटा सहज उपलब्ध करेल. हे केंद्र शाळांना साधन संपत्तीचे प्रभावी व्यवस्थापन, पालक आणि देश यांच्यातील संबंध दृढ करणे, आणि प्रतिसादात्मक पाठबळ देण्यासाठी उच्च-गुणवत्तेचा दृष्टीकोन प्रदान करेल.