Deenanath Mangeshkar Hospital And Research Center | Photo Credits @DMHospitalPune

पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयामध्ये 29 वर्षीय गर्भवतीचा उपचारा अभावी आणि हॉस्पिटल प्रशासनाच्या पैशांच्या हव्यासापोटी मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबाकडून केला जात असताना आता हॉस्पिटल च्या चौकशी समितीचा ( Deenanath Mangeshkar Hospital Panel Report) अहवाल समोर आला आहे. आज दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल कडून या प्रकरणी खुलासा करण्यात आला आहे. प्रशासनाने माध्यमांमध्ये चूकीची आणि अर्धवट माहिती दिली जात असल्याचं सांगण्यात आलं आहे. आता हॉस्पिटलच्या चौकशी समितीचा अहवाल समोर आला आहे. यामध्ये हॉस्पिटलने 4 निष्कर्ष काढत स्वतःची पाठराखण केली आहे. या समितीत रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर, वैद्यकीय सुप्रिटेंडन्ट डॉ. अनुजा जोशी, अतिदक्षता विभाग प्रमुख डॉ. समीर जोग आणि प्रशासक सचिन व्यवहारे यांचा समावेश आहे.

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे चार निष्कर्ष

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे चार निष्कर्ष हॉस्पिटल च्या दाव्यानुसार, रूग्णाच्या मृत्यूमुळे आलेली निराशा आणि अ‍ॅडव्हान्स मागितल्याने राग मनात धरून मृत महिलेच्या कुटूंबाने तक्रार केली आहे. दरम्यान हॉस्पिटलने काढलेल्या निष्कर्षामध्ये महिला रूग्णासाठी ट्वीन प्रेग्नंसी धोकादायक होती, ANC चेकअपसाठी पहिले सहा महिने रुग्णालयात आल्या नाहीत, अनामत रक्कम मागितल्याच्या रागातून तक्रार आणि जमेल तेवढे पैसे भरून रूग्णालयात भरती व्हा, हा सल्ला मानला नसल्याचं सांगण्यात आले आहे.

दरम्यान दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने अजूनही काही महत्त्वाचे मुद्दे यामध्ये त्यांच्या अहवालामध्ये लिहले आहेत. ज्यामध्ये तनिषा भिसे 2020 पासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत होत्या. भिसे यांच्यावर 2022 साली एक शस्त्रक्रियाही झाली असून त्यामध्ये त्यांना खर्चाच्या 50टक्के रकमेची सूट देण्यात आल्याचेही अहवालात म्हटले आहे. दरम्यान या चौकशी समितीच्या अहवालात असेही म्हटले आहे की, या पीडित महिलेची सुखरूप प्रसुती होण्याची शक्यता नसल्याने रुग्णालयाने त्यांना मूल दत्तक घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र अशा परिस्थितीमध्येही पीडित महिला इंदिरा आयव्हीएफचे रिपोर्ट घेऊन डॉक्टर घैसास यांना भेटायला आली होती. अतिशय जोखमीच्या व धोकादायक गर्भधारणेबाबत डॉक्टर घैसास यांनी त्यांना माहिती दिली होती. तसेच त्यांना दर 7 दिवसांनी तपासणीसाठी बोलावले होते. त्यानुसार त्यांनी 22 तारखेस येणे अपेक्षित होते. परंतु त्या तपासणीसाठी आल्या नाहीत.” (हेही वाचा: दीनानाथ मंगेशकर रूग्णालय मुख्यमंत्री कार्यालयाला जुमानत नसतील तर इतरांच काय घेऊन बसलात? पुण्याच्या गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांचे X पोस्ट शेअर करत आरोप).

हॉस्पिटलच्या अहवालावर भिसे कुटुंबाने संताप व्यक्त केला आहे. त्यांनी दहा लाख जमा केले होते. तशी पावती देखील असल्याचं म्हटलं आहे.

जुळ्या मुली वाकड च्या सूर्या हॉस्पिटल मध्ये

तनिषा भिसेचा मृत्यू झाला असला तरीही त्यांच्या दोन्ही जुळ्या मुली सुस्थितीमध्ये आहेत. त्यांचा जन्म सातव्या महिन्यात अर्थात प्रिमॅच्युअर झाल्याने सध्या त्यांना एनआयसीयू मध्ये ठेवण्यात आले आहे.