यंदा 31 मार्चच्या संकष्टी चतुर्थीला पुण्याच्या दगडूशेठ गणपतीचं मंदिरं भाविकांना दर्शनासाठी बंद
Dagdusheth Ganpati (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रामध्ये वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच स्तरावर पुन्हा निर्बंध कडक करण्यात आले आहेत. पुणे शहरावर कोरोनाचा वाढता विळखा पाहता नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी असे आवाहन केले आहे. त्यालाच प्रतिसाद देत आता पुण्याच्या दगडूशेठ मंदिरामध्ये येत्या संकष्टी चतुर्थी (31 मार्च) दिवशी भाविकांना दर्शन बंद करण्यात आलं आहे. दगडूशेठ गणपतीच्या भाविकांना मंदिरात जाऊन बाप्पाचं दर्शन घेता आलं नाही तरीही या दिवशी ऑनलाईन दर्शन सुरू राहणार आहे. तर 31 मार्चला संकष्टी चतुर्थी निमित्त मंदिरात धार्मिक कार्यक्रम ब्रम्हवृंदांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे. Bhalchandra Sankashti Chaturthi 2021: भालचंद्र संकष्टी चतुर्थी कधी आहे? शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या.

दरम्यान कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता दगडूशेठ गणपती मंदिराकडून बाप्पाचं दर्शन फेसबूक, ट्वीटर, युट्युब यांच्यासोबत मंदिराच्या वेबसाईट आणि अ‍ॅप वरून देखील 24 तास खुले करण्यात आले आहे. तर अभिषेक आणि इतर पुजा यांच्यासाठी देखील ऑनलाईन सुविधा खुली करण्यात आली आहे.

पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारीच पुणेकरांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचं आवाहन केले आहे. शहरातील वाढती रूग्णसंख्या चिंताजनक आहे. पुढील काही दिवसांत रूग्णसंख्या नियंत्रणात न आल्यास आणि नागरिकांनी कोविड 19 नियमांचे पालन न केल्यास 2 एप्रिल पासून कोविड 19 ला रोखण्यासाठी लॉकडाऊन सारखा निर्णय नाईलाजास्तव घ्यावा लागेल असे म्हटलं आहे.

पौर्णिमेनंतर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला 'संकष्टी चतुर्थी' (Sankashti Chaturthi) असे म्हणतात. दर महिन्यात संकष्टी चतुर्थी येते. या दिवशी गणेश भक्त गणपती बाप्पाची आराधना करतात. गणेशपूजन करून दिवसभर व्रत करतात. रात्री चंद्रोदयानंतर उपवास सोडण्याची प्रथा आहे.