Cyclone Nisarga Effect (PC - ANI)

Cyclone Nisarga Effect: अरबी समुद्रात निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने (Cyclone Nisarga) रौद्ररूप धारण केले आहे. हे चक्रीवादळ आज दुपारपर्यंत महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर विशेषत: अलिबाग, पालघर परिसरात धडकण्याची शक्यता आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबईसह किनारपट्टी भागात पावसाला सुरुवात झाली आहे. याशिवाय आज कोकण किनारपट्टी भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या विविध समुद्र किनारीपट्टी भागात एनडीआरफच्या (NDRF) बोटी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. निसर्ग चक्रीवादळाचा सामना करण्यास जिल्हा प्रशासन सज्ज आहे. निसर्ग चक्रीवादळाचा धोका टाळण्यासाठी आज वसई, पालघर, डहाणू तालुक्यातील उद्योग, खाजगी आस्थापना बंद राहणार आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी भागात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडं पडली आहेत. राज्यातील विविध ठिकाणांना निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. यासंदर्भातील काही व्हिडिओज आणि फोटोज पाहूयात. (वाचा - Nisarga Cyclone Live Tracker on Google Maps: 'निसर्ग चक्रीवादळ' चा मार्ग, वाऱ्याचा वेग, नेमके ठिकाण, किनारपट्टीलगत लँडफॉल गुगल मॅप्स वर कसे तपासाल?)

निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड मध्ये अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. येत्या काही वेळात रायगडजवळ लॅन्डफॉल होण्याची शक्याता आहे. याचा परिणाम मुंबई, ठाण्यामध्ये होणार आहे. (वाचा - Cyclone Nisarga Mumbai: मुंबई मध्ये निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर BMC सज्ज; रेस्क्यू बोट, जेट स्की ते NDRF च्या टीम्स अशा आहेत उपाययोजना)

निसर्ग चक्रीवादळ सध्या महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलं आहे. अगदी काही तासात ते महाराष्ट्रात धडकणार आहे. या वाऱ्याचे आगमन होण्याअगोदर अलिबागमध्ये जोरदार वाऱ्याला आणि पावसाला सुरूवात झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला, मालवण, देवगड तालुक्यात समुद्र खवळलेला आहे. दक्षिणेकडे वेंगुर्ले -मालवण मध्ये वाऱ्याचा जोर कमी असला तरी उत्तरेकडे देवगड-विजयदुर्गमध्ये वाऱ्याचा जोर वाढला आहे.

निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्राच्या जमिनीवर धडकलं आहे. पुढील तीन तास मुंबई, रायगड, रत्नागिरी या कोकणातील प्रदेशांसह नाशिक, पुणे या भागांना या वादळाचा तडाखा बसणार आहे. त्यामुळे मोठ नुकसान होण्याची शक्यता असून पुढील तीन तास अत्यंत कसोटीचे ठरणार आहेत. कोकण किनारपट्टी भागातील नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सुचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.