महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर आज (3 जून) निसर्ग चक्रीवादळ (Cyclone Nisarga) थोड्याच वेळात धडकणार आहे. त्यामुळे पुढील काही तासांत मुंबई शहरात जोरदार वारा आणि अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. या परिस्थितीमध्ये मुंबईकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी मुंबई महानगरपालिका (BMC) आणि राज्य सरकार सज्ज आहे. त्यासाठी मुंबईच्या विविध समुद्र किनारी 10 एनडीआरफच्या (NDRF) बोटी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. तरसोबतच कोरोनाशी झुंजणार्यांनाही सुरक्षित ठेवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. इथे पहा निसर्ग चक्रीवादळाचे लाईव्ह अपडेट्स!
मुंबई महानगर पालिकेने निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी 1916 डायल करून 4 दाबा हा हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे. तर कोळीवाड्याच्या भागातून काही नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. दरम्यान मुंबईसाठी पुढील काही तास धोक्याचे आहेत.
मुंबई महानगर पालिका प्रशासनाची कशी आहे तयारी?
- मुंबईतील ए विभाग, जी/दक्षिण, जी/उत्तर, एच/पश्चिम, के/पश्चिम, पी/उत्तर, आर/मध्य, आर/दक्षिण, अशा पश्चिम किनारपट्टीवरील विभाग अधिकाऱ्यांमार्फत धोकादायक व समुद्र किनाऱ्यानजीकच्या वस्त्यांतील नागरिकांचे स्थलांतर करुन त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत.
- आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी मुंबई अग्निशमन दलास सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 6 चौपाट्यांवर आतापर्यंत 93जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत.
- सर्व अग्निशमन केंद्रांना आवश्यक त्या यंत्रसामुग्रीसह सज्ज ठेवण्यात आले आहे. चौपाट्यांवर जीवरक्षकांप्रमाणेच रेस्क्यू बोट, जेट स्की आदी तैनात करण्यात आले आहेत.
- राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या एकूण 8 तुकड्या, नौदलाच्या 5 तुकड्या मुंबईसाठी विविध ठिकाणी करण्यात आल्या आहेत.
- एनडीआरएफची प्रत्येकी 1 टीम कुलाबा (ए विभाग), वरळी (जी/दक्षिण), वांद्रे (एच/पूर्व), अंधेरी (के/पश्चिम) येथे 3 टीम, मालाड (पी/दक्षिण) आणि बोरिवली (आर/उत्तर) याप्रमाणे तैनात आहेत.
- महापालिकेतर्फे सुमारे 35 शाळा आतापर्यंत नागरिकांच्या तात्पुरत्या निवाऱ्यासाठी निश्चित करण्यात आल्या असून नागरिकांना तेथे स्थलांतरित होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- पाणी साचण्याच्या संभाव्य 300 पेक्षा अधिक ठिकाणी पाणी उपसा करण्यासाठी पंप उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच, सहाही उदंचन केंद्रांवर (पंपिंग स्टेशन) पुरेसे मनुष्यबळ उपस्थित आहे.
- झाडांच्या फांद्या छाटण्याची कामे करण्यात आली आहेत. वादळामुळे उन्मळून पडणाऱ्या झाडांना तातडीने हलविण्यासाठी कर्मचारी नेमण्यात आले आहेत. प्रत्येक विभागामध्ये 4 याप्रमाणे 96 पथके तैनात आहेत.
- वादळवाऱ्यामुळे अडकून पडणाऱ्या वाहनांना टोईंग करण्याची व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे.
- सध्याच्या कोविड 19 विषाणू संसर्गाची परिस्थिती पाहता, कोरोना बाधितांना आवश्यक त्या सर्व आरोग्य सेवा योग्यरित्या मिळतील, याचीही पूर्णपणे काळजी घेतली जात आहे.
आज दुपारी 1 ते 4 या वेळेत चक्रीवादळ पुढे सरकणार आहे. यावेळेत वार्याचा वेग 120 ताशी वेगाने पुढे जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचंं आवाहन बीएमसीकडून करण्यात आलं आहे. आज रात्री पर्यंत हे वादळ समुद्रात पुढे जाईल आणि शांत होईल असा अंदाज आहे. आज मुंबई मनपा आयुक्त देखील पालिका डिझास्टर रूम मध्ये पोहचले आहेत.