
पुणे विमानतळावरुन (Pune Airport) सीमाशुल्क (Customs) विभागाच्या अधिकाऱ्यांनी तब्बल 26 लाख 45 हजार रुपयांचे सोने जप्त केले आहे. या प्रकरणी एका व्यक्ती अटक करण्यात आली आहे. संबंधित व्यक्ती हा दुबईहून (Dubai) आलेला एक प्रवासी आहे. पाठीमागील काही वर्षांमध्ये दुबईहून तस्करीच्या माध्यमातून आणल्या जाणाऱ्या सोन्याचे प्रमाण वाढले आहे. प्रामुख्याने हे सोने कच्चा स्वरुपात असते. आताही दुबईहून आलेला जो प्रवासी पकडला गला आहे त्याच्याकडून 24 कॅरेट गुणवत्तेच्या 500 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या आणि चेन जप्त केल्या आहेत.
सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या कारवाईत हे घबाड हातील लागले. हा प्रवासी स्पाईस जेटच्या विमानाने पुणे विमानतळावर उतरला. त्याची हालचाल संशयास्पद होती. त्यामुळे त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे कच्चा सोन्याच्या बांगड्या आणि चेन अशा रुपात जवळपास 500 ग्रॅम वजनाचे आणि 24 कॅरेट शुद्ध स्वरुपातील सोने आढळून आले. या सोन्याची बाजारातील किंमत तब्बल 26 लाख 45 हजार रुपये इतकी असल्याचे सांगितले जात आहे. (हेही वाचा, प्रवाशांना सेवा पुरवण्यात पुणे विमानतळ अव्वल; जगात पटकावला तिसरा क्रमांक)
दरम्यान, प्रवाशाकडील सोने सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे. तर संबंधित प्रवाशाला पुढील कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यावर सीमाशुल्क कायद्यात असलेल्या तरतुदींनुसार कारवाईक करण्यात आली आहे. हे सोने नेमके कोणत्या कारणासाठी आणले. त्यामागे कोणते तस्करीचे रॅकेट आहे का? स्थानिक लोकही यात सहभागी आहेत का? याबाबतही चौकशी सुरु झाली आहे.