Covid-19: कल्याण-डोंबिवली येथे कोरोनाचा धोका वाढला; एकाच दिवशी 6 रुग्ण आढळल्याने परिसरात घबराट
Coronavirus | Photo Credits: Pixabay.com

महाराष्ट्रात (Maharashtra)कोरोना विषाणूचे (Coronavirus) जाळे अधिक वेगाने पसरत चालले आहे. यातच कल्याण- डोंबिवली (Kalyan-Dombivali) परिसरात एकाच दिवशी 6 कोरोनाबाधीत रुग्ण आढळ्याने अधिक आढळल्याने नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, डोंबिवली परिसरात 5 रुग्ण तर, कल्याणमध्ये 1 रुग्ण आढळला आहे. डोंबिवलीतील 5 रुग्ण हे तुकारामनगर परिसरातील असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. खबरदारी म्हणून या सहा रुग्णांच्या संपर्कात आलेल्या घरातील सदस्य, परिसरातील नागरिक आणि इतर लोकांची यादी तयार करण्यात आली असून त्यांचीही तपासणी केली जाणार आहे. कोरोना विषाणूचे वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र, कोरोनाबाबत अद्यापही सकारात्मक बदल दिसून न आल्याने सर्वांचीच चिंता वाढू लागली आहे.

राज्यातील कोरोनाबाधीतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे, असे असतानाच मुंबईची धाकधूक वाढवणारे वृत्त समोर आले आहे. कल्याण डोंबिवली परिसरात 9 एप्रिलपर्यंत कोरोनाबाधितांची संख्याही 43 वर पोहोचली होती. आज यामध्ये या नव्या 6 रुग्णांची भर पडली आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 1 हजार 380 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैंकी 72 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 117 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यावर कोरोनाचे मोठे संकट निर्माण झाले असून नागरिकांनी न घाबरता याचा सामना करावे, असे आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे नागरिकांना वारंवार करत आहेत. एवढेच नव्हेतर, उद्धव ठाकरे हे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यामातून नागरिकांशी सतत संवाद साधत आहेत. तसेच कोरोनाशी लढण्यासाठी जनतेच्या मनगटात बळ देण्याची योग्य भुमिकाही बजावत आहेत. हे देखील वाचा- महाराष्ट्रात नव्या 16 कोरोना बाधितांसह राज्यात COVID-19 रुग्णांची संख्या 1380 वर

दरम्यान, कल्याण डोंबिवली परिसरात आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण चालू असून नागरिकांनी घाबरून न जाता सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळून आल्‍यास त्‍वरीत महापालिकेच्‍या रूग्‍णालयाशी संपर्क साधावा. महापालिकेच्या आरोग्य पथकास सहकार्य करावे. तसेच अधिक माहितीकरीता बाई रूक्‍मिणीबाई रूग्‍णालय, कल्‍याण येथील 0251- 2310700 व शास्‍त्रीनगर सामान्‍य रूग्‍णालय, डोंबिवली येथील 0251- 2481073 व 0251- 2495338 या हेल्‍पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहनही महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.