![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/08/Coronavirus-380x214.jpg)
देशात कोरोना व्हायरसची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) ओसरत आहे. दिवसागणित आढळणारी रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. परंतु, कोरोनाचे संकट पूर्णपणे टळलेले नाही. सुरुवातीपासूनच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा (Coronavirus Third Wave) धोका वर्तवण्यात आला होता. त्यामुळे अनेक राज्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी तयारीत आहेत. यातच आता महाराष्ट्रात (Maharashtra) 2-4 आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सच्या पार पडलेल्या बैठकीत तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवण्यात आला आहे. यात दोन ते चार आठवड्यात राज्यात कोरोनाची तिसरी लाट येईल, असा अंदाज टास्क फोर्सने वर्तवला आहे.
बैठकीतील अधिकाऱ्यांनुसार, डेल्टा प्लस वेरिएंट (Delta Plus Variant) मुळे महाराष्ट्रात तिसरी लाट येऊ शकते. या लाटेचा वेग दुप्पट असेल. त्यामुळे कोविड-19 निर्बंधांचे पालन न केल्यास आपण दुसरी लाट संपताच तिसऱ्या लाटेत प्रवेश करु. (Coronavirus Third Wave: सावधगिरी बाळगा अन्यथा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करा, पहा काय म्हणाले सरकारचे वैज्ञानिक सल्लागार)
धोका टाळण्यासाठी लसीकरणाला महत्त्व देणे, कोरोना गाईडलाईन्सचे पालन करणे महत्त्वाचे असल्याचे तज्ञांचे मत आहे. त्याचबरोबर गर्दी टाळणे आणि कोरोना त्रिसुत्री म्हणजेच- मास्क घालणे, सोशल डिस्टसिंग, हात वारंवार धुणे यांचे पालन न केल्यास धोका अधिक वाढू शकतो, असे टास्क फोर्समधील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, "दुसरी लाट ओसरत असतानाच चार आठवड्यात ब्रिटेन मध्ये तिसरी लाट आली होती. त्यामुळेच सतर्क न राहिल्यास आणि कोविड नियमांचे पालन न केल्यास आपल्यासमोरही अशा प्रकराची परिस्थिती उद्भवू शकते." त्याचबरोबर लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.