चीन मधून जगभरात धूमाकुळ घालत असलेला कोरोना व्हायरस आता भारतामध्येही येऊन पोहचला आहे. मात्र महाराष्ट्र राज्यासाठी दिलासादायक माहिती म्हणजे अद्याप राज्यात कोरोनाग्रस्त रूग्ण नाहीत. आज महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सध्या 15 जण निरीक्षणाखाली असून 258 जणांना घरी सोडण्यात आले आहे. अद्याप महाराष्ट्रामध्ये एकही संशयित रूग्ण नसून या आजाराशी लढा देण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आली आहे. यासोबतच सध्या कोरोना वायरस बाबत विविध माध्यमांतून जनप्रबोधन केले जात आहे. त्याच्याद्वारा समाजात जनजागृती केली जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, भारतामध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रूग्णांचा आकडा 40 वर पोहचला आहे. यामध्ये एका तीन वर्षांच्या चिमुकल्याचादेखील समावेश आहे. प्रामुख्याने रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असणार्या रूग्णांचा कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर मृत्यू होण्याची भीती अधिक आहे. त्यामुळे आता अनेक ठिकाणी भारतात शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (हेही वाचा: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर होळीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा करु नका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागरिकांना आवाहन).
राजेश टोपे यांचे ट्वीट
#coronavirus पार्श्वभूमीवर सध्या निरीक्षणाखाली १५ जण असून २५८ जणांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात अद्याप एकही संशयित रुग्ण आढळून आला नसून प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी विविध माध्यमांतून जनप्रबोधन करण्यात येत आहे. pic.twitter.com/ivRMxCrXfV
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 8, 2020
मुंबईसह महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना वायरसचा धोका आटोक्यात ठेवण्यासाठी विविध रूग्णालयांमध्ये आयसोलेशन वॉर्ड्स उभारण्यात आले आहेत. तसेच लॅब्सदेखील सुरू करण्यात आल्या आहेत. दरम्यान कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असल्याने परदेशवारी करण्यापूर्वी विचार करण्याचा, गर्दीची ठिकाणं टाळण्याचा तसेच वारंवार हात स्वच्छ धुण्याचा सल्ला देण्यात आला आहे. Mumbai: बीएमसी व महाराष्ट्र सरकारने 'कोरोना व्हायरस'संदर्भात जारी केले 24x7 हेल्पलाईन क्रमांक; आता मुंबईत 1916 नंबरवर मिळू शकणार मदत.
जगभरात कोरोना वायरसने 3800 पेक्षा अधिक बळी घेतले आहेत. त्यामुळे यंदा होळी सणाच्या सेलिब्रेशनवरही या व्हायरसचे संकट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यंदा होळीचा सण सांभाळून खेळण्याचा सल्ला दिला आहे.