(Photo Credit: Wikipedia)

भारतासह जगातील सर्वच देशांमध्ये सध्या कोरोना व्हायरसमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. व्हायरसच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी, बहुतेक देशांमध्येलॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे, जेणेकरून सामाजिक अंतराच्या माध्यमातून त्याचा प्रसार रोखता येईल. या कठीण परिस्थितीत मुंबई क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र सरकारच्या मदतीसाठी आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) 26 मार्च रोजी राज्य सरकारला कोविड-19 विरुद्ध लढा देण्यासाठी देणगी देण्याचा निर्णय घेतला. एमसीएने महाराष्ट्र सरकारला 50 लाख देणगी जाहीर केली आहे. एमसीएचे सचिव संजय नाईक यांनी पीटीआयला सांगितले की, शहरातील क्रिकेट मंडळाने 26 मार्च रोजी अ‍ॅपेक्स कौन्सिलची बैठक आयोजित केली होती ज्यात अध्यक्ष आणि सचिव यांना देणगीची रक्कम ठरविण्यास अधिकृत केले होते. नाईक म्हणाले, “त्यानुसार आम्ही 50 लाख रुपये देण्याचे ठरविले आहे."

एमसीए अ‍ॅपेक्स कौन्सिलच्या सदस्याने सांगितले की ही रक्कम मुख्यमंत्री मदत निधीमध्ये दान केली जाईल. एमसीए दक्षिणेकडील वानखेडे स्टेडियमसह आपली मालमत्ता सरकारला आवश्यक असल्यास संगोपनासाठी देण्यास तयार असल्याचे सदस्याने सांगितले. कोरोना व्हायरसमुळे महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक प्रभावित राज्यांपैकी एक असून 26 मार्च दुपारपर्यंत 124 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

केरळमध्ये महाराष्ट्रानंतर या विषाणूचा प्रादुर्भाव पसरला आहे. आतापर्यंत येथे 105 रूग्ण आढळून आले असून याक्षणी एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. भारतात आजवर कोरोना व्हायरसमुळे 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत देशात 21 दिवस लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा वाढणारा आकडा चिंताजनक आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी गरजेशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. भारतात कोरोना बाधितांचा आकडा 600 च्या पार गेला आहे शिवाय राज्यातही रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे सरकारकडून देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.