गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा विषाणू (Coronavirus) कहर वाढत आहे. काल राज्यात 6,281 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण 48,439 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. मराठवाडा, विदर्भ या ठिकाणीही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) रविवारी सात वाजता राज्याला संबोधित करणार आहेत. कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू होतो की काय अशी शंका वाटत आहे. यापूर्वी मुख्यमंत्री म्हणाले होते की, जर लोकांनी नियम मोडणे थांबवले नाही तर राज्यात पुन्हा लॉकडाउन लागू केला जाऊ शकतो.
महाराष्ट्र मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आधीच सांगितले आहे की, नागपूर, अमरावती, यवतमाळ यासारख्या जिल्ह्यांमध्ये कोविडच्या वाढत्या घटना लक्षात घेता राज्य सरकार या जिल्ह्यांमध्ये नाईट कर्फ्यू लावण्याचा विचार करीत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक होणार असून त्यामध्ये निर्णय घेतला जाईल. आज पुण्यात रात्री 11 ते सकाळी सहापर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असल्याची बातमी मिळत आहे. सोमवारपासून ही संचारबंदी लागू होईल. तसेच शाळा आणि महाविद्यालये 28 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना संसर्गाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. म्हणून काही निवडक ठिकाणी लॉकडाउन लागू होऊ शकतो असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मुंबई, ठाणे, अमरावती, पुणे, नागपूर इत्यादी भागात अलिकडच्या काळात कोरोनाचे प्रमाण वाढले आहे. पालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी शनिवारी म्हणाले की, मुंबईत लॉकडाउन हा पर्याय नाही. पण आम्ही सर्वात वाईट परिस्थितीची तयारी करत आहोत. व्हेंटिलेटर, पॅरा मॉनिटर्स, हाऊसकीपिंग, औषधे, ऑक्सिजन, अग्निशमन उपकरणे व सुरक्षितता याची तपासणी करण्याच्या सूचना मी सर्व जंबो सेन्टर्सना दिल्या आहेत. (हेही वाचा: पुण्यात 'लॉकडाऊन' नाही, पण मायक्रो कंटेन्मेंट झोन लागू करण्याचा विचार सुरू; महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती)
दरम्यान, याआधी अनेकवेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधून कोरोना परिस्थिती व त्याबाबत विविध सूचना केल्या आहेत. जनतेही त्यांचे म्हणणे गांभीर्याने घेऊन त्या अंमलातही आणल्या होत्या. मात्र अनलॉकमध्ये अनेक गोष्टींना परवानगी दिल्याने आता या नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. म्हणून वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आज 7 वाजता जनतेशी संवाद साधतील. यावेळी मुख्यमंत्री नक्की काय घोषणा करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.