पुण्यात 'लॉकडाऊन' नाही, पण मायक्रो कंटेन्मेंट झोन लागू करण्याचा विचार सुरू; महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती
पुणे महापौर मुरलीधर मोहोळ (Photo Credits-ANI)

पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी ती नियंत्रणात आहे. त्यामुळे लॉकडाऊन लागू करण्याचा तूर्तास कोणताही विचार नाही. मात्र, मायक्रो कंटेन्मेंट झोन लागू करण्याचा विचार असून त्याबाबत लवकरचं निर्णय घेण्यात येईल, असं पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पुणे शहरासह जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. याबाबतचे सविस्तर आदेश लवकरचं जारी करण्यात येतील, असंही मोहोळ यांनी सांगितलं आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट, बार रात्री 11 वाजेपर्यंतच सुरु ठेवण्यास परवानगी असणार आहे. याबाबतचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यावरील महापालिकेचा सविस्तर आदेश लवकरचं प्रसिद्ध केला जाईल, असंही मोहोळ यांनी म्हटलं आहे.

तसेच शहरात रात्री 11 वाजल्यानंतर अनावश्यक फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. आपणही रात्री 11 नंतर घराबाहेर पडणे टाळा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागू शकतं, असा इशारा मुरलीधर मोहोळ यांनी दिला आहे. (वाचा - लॉकडाऊन संदर्भात अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई; नांदेड जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा)

याशिवाय विवाह सोहळ्यास किंवा समारंभास होणारी गर्दी लक्षात घेता, यावरही कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लग्न तसेच समारंभास केवळ 200 जणांची उपस्थितीचं असावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल. यासंदर्भात आज झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, पुणे शहरात शनिवारी नव्याने 414 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे पुणे शहरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 1 लाख 97 हजार 330 इतकी झाली आहे. शहरातील 247 कोरोनाबाधितांना शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची संख्या आता 1 लाख 89 हजार 948 झाली आहे.