
गेल्या एक वर्षापासून देशात कोरोना विषाणूची (Coronavirus) लाट पसरली आहे. महाराष्ट्रामध्ये तर कोरोनाने मोठ्या प्रमाणावर थैमान घातले होते. काही महिन्यांपूर्वी हा संसर्ग कमी झाला होता मात्र आता पुन्हा राज्यात विषाणूने डोके वर काढले आहे. राज्यात आज 10,216 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे व आज नवीन 6,467 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत एकूण 20,55,951 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 88,838 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत व राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.52% झाले आहे.
राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 53 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाले आहेत. अशाप्रकारे आतापर्यंत 52,393 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यामध्ये आतापर्यंत 21,98,399 रुग्णांची नोंद झाली आहे. आज गेल्या 4 महिन्यांमध्ये सर्वात जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. राज्याची राजधानी मुंबईमध्ये 1173 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आज 3 रुग्णांचा मृत्यू झाले असून, आजपर्यंत 11490 रुग्णांचा मृत्यू झाले आहेत. (हेही वाचा: Maharashtra Economic Survey 2021: अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला राज्याचा 2020-21 चा आर्थिक पाहणी अहवाल; अर्थव्यवस्थेत - 8% वाढ अपेक्षित)
राज्यातील सक्रीय रुग्णांचा विचार करता पुण्यात सर्वात जास्त रुग्ण आहेत तर त्यापाठोपाठ नागपूर, ठाणे आणि मुंबईचा नंबर लागतो. पुण्यात 18 हजार तर नागपुरात 11 हजारपेक्षा जास्त अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मुंबई-ठाण्यात 9 हजार रुग्ण आहेत. सध्या राज्यामध्ये कोरोना लसीकरण मोहीम सुरु आहे. महानगरपालिका/शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरण विनामूल्य आहे. त्याचबरोबर खासगी रुग्णालयांमधील प्रत्येक डोससाठी 250 रुपये शुल्क आकारले जाईल. लससाठी 150 रुपये आणि सर्व्हिस चार्जसाठी 100 रुपये द्यावे लागतील. आता मुंबईमध्ये बीएमसी केंद्रांव्यतिरिक्त 29 खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना व्हायरस लसीकरण मोहीम राबविण्यास परवानगी देण्यात आली आहे.