ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे. एका हॉटेलमध्ये कर्मचाऱ्यांना झालेल्या कोरना संक्रमनामुळे ही बाब पुढे आली आहे. घोडबंदर (Ghodbunder) रोडवर असलेल्या या हॉटेलचे नाव एक्सप्रेस इन (Hotel Express Inn) असे आहे. या हॉटेलमधील तब्बल 21 कर्मचारी कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित आढळले आहेत. त्यामुळे मीरा भाईंदर (Mira Bhayandar) महापालिका प्रशासनाने हे हॉटेल सील केले आहे. दरम्यान, या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या हॉटेल ग्राहकांचा शोध सध्या सुरु आहे. तसेच, एकूण किती ग्राहक या लोकांच्या संपर्कात आले आहेत याचाही निश्चित आकडा अद्याप पुढे येऊ शकला नाही.
प्राप्त माहितीनुसार हॉटेल एक्सप्रेस इन हे घोडबंदर मार्गावरील वरसावे नाका परिसरात आहे. या हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली असता एकूण कर्मचाऱ्यांपैकी तब्बल 21 कर्मचारी कोरोना व्हायरस संक्रमित आढलले. त्यामुळे मीरा भाईंदर महापालिका प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत यांनी हे हॉटेल 18 फेब्रुवारी ते 4 मार्च 2021 या कालावधीसाठी सील केले आहे. हॉटेलची संपूर्ण इमारत सीलकरण्यात आली आहे. याबाबतचे आदेशही हॉटेलच्या दर्शनी भागात लावल्याचे पाहायला मिळत आहे. (हेही वाचा, Mumbai Police: मास्क न घातलेल्या नागरिकांकडून मुंबई पोलीस दंड आकारणार)
मधल्या काळात मीरा भाईंदरमध्ये कोरोना व्हायरस संक्रमितांचे प्रमाण अगदीच कमी झाले होते. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता खरा. मात्र, आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
कोरोना व्हायरस संक्रमन कमी व्हावे यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार आणि स्थानिक प्रशासन प्रयत्नशिल आहे. मात्र,बेजबाबदार नागरिक मोठ्या प्रमाणावर कोरोना नियमांचे उल्लंघन करत आहेत. राजकीय कार्यक्रम, विवाह, धार्मिक कार्यक्रम, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी असे चित्र सऱ्हास दिसत आहे. यात राजकीय नेते, समाजातील प्रतिष्ठीत लोकही चुकीच्या पद्धतीने वर्तन करताना दिसत आहेत. या सर्व गोष्टींमुळे कोरोना नियमांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होत आहे. परिणामी कोरोना रुग्णाची संख्या अधिकच वाढताना दिसत आहे.