Coronavirus In Maharashtra Police: महाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 184 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण तर 4 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू
Maharashtra Police (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून दिवसागणिक झपाट्याने रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. याच दरम्यान आता राज्यातील पोलीस दलातील आणखी 184 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 4 जणांचा कोरोनामुळे गेल्या 24 तासात मृत्यू झाल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांकडून देण्यात आली आहे.राज्यात पोलीस दलात सध्या 3728 अॅक्टिव्ह रुग्ण असून 15,156 जणांची प्रकृती सुधारली आहे. तसेच 190 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे पोलीस विभागातील एकूण 19,074 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.(पुणे जिल्ह्यात रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवणा-या टँकरना रुग्णवाहिकांचा दर्जा देण्याचे आदेश; टँकरमध्येही असणार 'ही' विशेष सुविधा)

कोरोनाच्या काळात पोलीस दलातील वयाच्या 55 वर्षापेक्षा अधिक वय असलेले कर्मचारी काम करणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच राज्यातील वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स, नर्स यांच्याकडून कोरोनाग्रस्त रुग्णांवर अहोरात्र उपचार करण्यात येत आहेत. तर राज्यात पुन्हा लॉकडाऊनची गरज नसल्याचे नुकतेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. (Coronavirus In Mumbai: कोरोनाची लक्षणे नसलेल्यांनी घरीच आयसोलेशमध्ये राहण्याची BMC ची सूचना)

दरम्यान, महाराष्ट्र आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या अपडेट्सनुसार, मागील 24 तासांत राज्यात 22,084 नवे रुग्ण आढळले असून राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 10 लाख 37 हजार 765 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे राज्यात 13,489 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. यामुळे राज्यात कोरोनावर मात केलेल्या रुग्णांच्या आकडा 7 लाख 28 हजार 512 वर पोहोचला आहे. राज्यात मागील 24 तासांत 391 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.