Coronavirus Outbreak: पुणे मध्ये कोरोना व्हायरसबाधित 3 नव्या रूग्णांचा मृत्यू; शहरातील Covid 19  बळींचा आकडा 13
Coronavirus | Image Used For Representational Purpose | File Image

पुणेमध्ये आज (8 एप्रिल) सकाळी दोन आणि आता 3 नवे रूग्ण दगावल्याने शहरात कोव्हिड 19 च्या बळींची संख्या 13 वर पोहचली आहे. दरम्यान पुणे पालिकेचे म्युनिसिपल कमिशनर शेखर गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार 3 नव्या दगावलेल्या रूग्णांमध्येही इतर गुंतागुंतीच्या आजाराचा धोका होता. दरम्यान राज्यामध्ये आता एकुण कोरोनाबाधितांचा आकडा 1078 वर पोहचला आहे. आज सकाळी देण्यात आलेल्या माहितीनुसार, 60 नव्या रुग्णांचाही समावेश आहे. मुंबई महापालिका (Brihanmumbai Municipal Corporation) मध्ये 44 नव्या रुग्णांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. सोबतच पुणे 9, नागपूर 4, आणि अहमदनगर, अकोला, बुलढाणा येथे प्रत्येकी एका नवा कोरोनाबाधित रूग्ण आढळला आहे. (हेही वाचा, पुणे: ससून हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रूग्णाचा मृत्यू; शहरातील Covid 19 मुळे बळींचा आकडा 10 वर)

कोरोना व्हायरस हा श्वसनप्रक्रियेवर हल्ला करतो. दरम्यान कोरोना व्हायरस हा मानवी शरीराला नवीन असल्याने रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांमध्ये त्याचा धोका अधिक असतो. म्हणून वयोवृद्ध नागरिकांसोबत मधुमेह, उच्च रक्तदाब, हृद्यविकार यांचा त्रास असलेल्यांना सांभाळण्याचे आवाहन आरोग्ययंत्रणेकडून करण्यात आलं आहे. अशा आजारामुळे कोव्हिड 19 चा सामना करताना उपचारादरम्यान मृत्यूमुखी पडणार्‍यांची संख्या राज्यात अधिक आहे.

ANI Tweet

भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 5000 च्या पार गेला आहे. सध्या देशात 4643 रूग्ण उपचार घेत असून देशात एकूण 149 जणांचा बळी गेला आहे तर 402 जण कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा 1078 असून 64 जणांचा बळी गेला आहे.