कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकटात अनेकजण यशाशक्ती मदत करत असताना आता गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढ्यासाठी लता मंगेशकर यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत (Chief Ministers Relief Fund) 25 लाखांचे योगदान दिलं आहे. यापूर्वी लतादीदींनी सामाजिक बांधिलकी जपत कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून लांब राहण्यासाठी नागरिकांना खास आवाहनही केलं होतंं. कोरोना व्हायरसचे जागतिक संकट परतवून लावण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे. कोरोना व्हायरसचा वाढता विळखा पाहता वैद्यकीय सेवा सुविधांसह प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी करणे यासाठी आर्थिक आधार हवा. तसंच लॉकडाऊनमुळे निर्माण झालेले प्रश्न सोडवण्यासाठी आर्थिक पाठबळाची गरज भासणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधीत दान करावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आले होते. त्यानंतर सर्वच स्तरातून मदतीचा ओघ सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मराठी कलाकारांसह अनेकांनी पुढे येत मुख्यमंत्री सहायता निधीत दान केले आहे. त्याचबरोबर अक्षय कुमार, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, विराट कोहली यांनीही प्रधानमंत्री सहायता निधीत योगदान दिले आहे. तसंच अनेक नामवंत संस्था, सेलिब्रेटी आणि दिग्गज मंडळी यांनी देखील कोरोना व्हायरसच्या लढ्यात आर्थिक मदत केली आहे.
ANI Tweet:
Legendary singer Lata Mangeshkar donates Rs 25 Lakh to Chief Ministers Relief Fund, Maharashtra for the fight against #COVID19 (file pic) pic.twitter.com/Ok2fQGDp1x
— ANI (@ANI) March 31, 2020
कोरोना व्हायरसची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे 225 रुग्ण असून भारतात हा आकडा 1000 च्या पार गेला आहे. त्यामुळे काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यात यशस्वी होण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत असताना त्या प्रयत्नांना आपल्या सहकार्याची साथ मिळणे अत्यंत आवश्यक आहे.