Coronavirus: अंबरनाथ पोलीस ठाण्यातील 4 आरोपींची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

महाराष्ट्रात (Maharashtra) दिवसेंदिवस कोरोना विषाणूचे (Coronavirus) जाळे पसरत चालले आहे. आता कोरोना विषाणूने राज्यातील अनेक तरुंगातही शिरकाव केला आहे. यातच अंबरनाथ (Ambernath) येथील 4 आरोपींची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. अंबरनाथच्या शास्त्रीनगर परिसरात गेल्या आठवड्यात 15 ते 16 जणांच्या टोळक्याने नंग्या तलवारी नाचवात दहशत निर्माण करून 4 जणांवर हल्ला केला होता. अंबरनाथ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबिधित आरोपींना गेल्या आठवड्यात मारहाण प्रकरणात आरोपींना अटक केली होती. त्यानंतर कोर्टाने त्यांना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आता त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. प्रोटोकॉलनुसार, आरोपींना तुरुंगात पाठवण्यापूर्वी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. दरम्यान, चारही आरोपींची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सफाई कामगार जीवापाड प्रयत्न करत आहेत. मात्र, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अनेक पोलीस कर्मचारीही कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यातच अंबरनाथ पोलीस ठाण्यातील आरोपींनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खून प्रकरणातील 35 ते 40 वर्षीय आरोपींना गुरुवारी न्यायलयीन कोठडी सुनावली जाणार होती. प्रोटोकॉलनुसार, त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलीसांनी अंबरनाथ महापालिकेला कळवले आहे. हे देखील वाचा- Coronavirus: जळगाव येथे आणखी 2 रुग्ण आढळले; जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 237 वर

सध्या आरोपींना ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. दरम्यान या गुन्हेगारांच्या संपर्कातील इतर 3 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अंबरनाथ पोलीस स्टेशनचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. अंबरनाथ पोलीस ठाण्यात 130 कर्माचारी कार्यरत आहेत. त्यापैकी कोणालाही कोरोनाची लागण झाली नाही, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.