Coronavirus: कृषी महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर 'Promoted (COVID-19)' असा उल्लेख, मंत्री दादा भुसे यांच्याकडून स्पष्टीकरण
Agriculture Minister Dada Bhuse | Photo Credits: Twitter)

राज्यातील एका कृषी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर 'Promoted (COVID-19)' उल्लेख असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो 'श्री छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज ऑफ हॉस्टिकल्चरच्या B'Sc हॉर्टीकल्चरच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रीकेवरील असल्याचे सांगण्यात येते आहे. तसेच या कॉलेजमध्ये 247 विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांवरही असा उल्लेख असल्याचेही पुढे येत आहे. लेटेस्टली मराठी या फोटोची पुष्टी करत नाही. दरम्यान, कृषी मंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse) यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कोणत्याही विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांवर अशा प्रकारचा उल्लेख असणार नाही, अशी ग्वाही त्यांनी विद्यार्थी आणि पालकांना दिली आहे.

विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांवर कोविड 19 PROMOTED असा उल्लेख येऊ नये यासाठी राज्यातील विरोधी पक्ष पहिल्यापासूनच आग्रही आहे. त्यातच राज् सरकारनेही विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर असा उल्लेख असणार नाही, असे स्पष्ट केले आहे. असे असतानाही महाविद्यालयाने असा प्रताप केल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे या मुद्द्यावरुन राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, भाजप आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करुन या प्रकाराबद्दल सरकारवर टीका केली आहे. (हेही वाचा, Maharashtra Board Class 10, 12 Results 2020: महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार? जुलै अखेर लागणार दहावीचा निकाल)

कृषीमंत्री दादा भुसे यांनी यांनी परसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर अशा प्रकराचा कोणताच उल्लेख असणार नाही. विद्यार्थ्यांच्या या आधीच्या सत्रांचे गुण आणि शेवटच्या वर्षाचे 50 गुण अशी सरासरी काढून विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात येईल. त्यावर कोविड 19 असा कोणताही उल्लेख असणार नाही. हे निकाल जुलै महिना अखेरीपर्यंत जाहीर होतील. विद्यार्थी आणि पालकांनी निश्चिंत राहावे असेही कृषीमंत्री भुसे म्हणाले.