पुणे: कागदी पिशवीसाठी 8 रुपये आकारल्याने ग्राहक मंचाने ठोठावला 25 हजारांचा दंड
Paper Bag (PC - pexels)

कागदी पिशवीसाठी (Paper Bag) 8 रुपये आकारल्याने ग्राहक मंचाने (Customer Forum) दुकानदाराला 25 हजार रुपयांचा दंड (Penalties) ठोठावला आहे. ग्राहकाला झालेल्या शारिरीक आणि मानसिक त्रासामुळे त्याला 30 दिवसांच्या आत पैसे देण्याचे आदेश पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष उमेश जावळीकर यांनी 'रिलायन्स क्लोदिंग इंडिया'ला दिला आहे. दविंदर सिंह या ग्राहकाने विमानगर परिसरातील 'रिलायन्स क्लोदिंग इंडिया प्रा. लि.' (Reliance Clothing India Pvt. Ltd.) या दुकानाच्या स्टोअर मॅनेजर विरोधात तक्रार दाखल केली होती.

दविंदर सिंह यांनी एप्रिल 2019 मध्ये संबंधित दुकानातून बूट खरेदी केले होते. त्यावेळी दुकानदाराने बूट ठेवण्यासाठी देण्यात आलेल्या कागदी पिशवीसाठी 8 रुपये आकारले होते. त्यामुळे सिंह यांनी चंडीगड ग्राहक आयोगाच्या निकालाची माहिती देऊन कागदी पिशवीचे 8 रुपये देण्यास आपण बांधील नसल्याचे सांगितले होते. तसेच रक्कम परत देण्याची मागणीही केली होती. मात्र, दुकानदाराने दविंदर यांना पैसे परत केले नाहीत. (हेही वाचा  - सावधान! चप्पल आणि सँडल घालून दुचाकी चालविल्यास बसणार भुर्दंड; दुस-यांदा पकडले गेल्यास सरळ तुरुंगात रवानगी)

ग्राहक दविंदर यांना देण्यात आलेल्या पिशवीवर कोठेही किंमत नमूद करण्यात आली नव्हती. या पिशवीवर केवळ दुकानाची जाहिरात करण्यात आली होती. कापडी पिशवीसाठी 8 रुपये आकारल्याने ग्राहकाने रिलायन्सला नोटीस पाठवली होती. मात्र, त्यानंतर रिलायन्सकडून ग्राहकाला केवळ माफीनामा पाठवण्यात आला. परंतु, रिलायन्सने पिशवीसाठी आकारलेली रक्कम देण्यास नकार दिला. त्यानंतर ग्राहकांने ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर ग्राहक मंचाकडून रिलायन्सला नोटीस पाठवण्यात आली. परंतु, रिलायन्स कंपनीतर्फे कोणीही हजर राहिले नाही. त्यामुळे ग्राहक मंचाने रिलायन्सला 9 टक्के व्याजदराने ग्राहकाला पैसे देण्यास सांगितले आहे.