पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की साथीचे आजार सुरू होतात. मुंबईतही आता साथीच्या आजारांनी डोकं वर काढलं आहे. मागील काही दिवसांत यामध्ये डोळ्यांची साथ (Conjunctivitis) पसरत आहे. त्यामुळे नागरिकांनी डोळ्यांचं आरोग्य जपावं असं आवाहन बीएमसी (BMC) कडून करण्यात आलं आहे. तसेच डोळ्यांना त्रास होत असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे.
मुंबई मध्ये मागील दोन आठवड्यात सुमारे 250-300 डोळ्यांच्या समस्या घेऊन रूग्ण पालिकेच्या मुरली देवरा आय हॉस्पिटल मध्ये आले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात जेव्हा हवेतील आद्रता वाढते तेव्हा सहाजिकच वातावरणामध्ये इंफेक्शन वाढण्याचा धोका संभावतो. त्यामुळे डोळे आल्याच्या साथीच्या रूग्णांतही मुंबई मध्ये वाढ पहायला मिळत आहे. नक्की वाचा: Dengue Symptoms And Treatment: पावसाच्या पाण्यात झपाट्याने वाढतात डेंग्यूचे डास; 'ही' लक्षणे दिसल्यास करा त्वरित तपासणी .
डोळे आल्याच्या साथीची लक्षणं
- डोळ्यातून सतत पाणी येणं
- डोळे सूजणं
- डोळ्यांतून चिकट स्त्राव वाहणं
- डोळ्यांमध्ये खाज येणं
- डोळ्यांना थेट प्रकाश पाहताना त्रास होणं
- डोळे जड वाटणं
दरम्यान वरील लक्षणं जाणवत असल्यास सतत डोळ्यांना हात लावणं टाळा. नियमित डोळ्यांना स्वच्छ करत रहा. नीट काळजी घेतल्यास डोळे आल्याच्या लक्षणापासून तुम्हांला 5-6 दिवसांत आराम मिळू शकतो.
घरगुती औषधांवर अवलंबून राहणं टाळा आणि वेळीच योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या. अधिक त्रास जाणवत असल्यास आय स्पेशलिस्टची मदत घ्या. सरकारी रूग्णालयांमध्ये डोळ्यांच्या साथीवरील औषधं मोफत उपलब्ध आहेत.