Remdesivir: दिल्लीची हुजरेगिरी करून महाराष्ट्राची बदनामी करणारे हे मंत्री आपल्या काय कामाचे?  ​नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर,  रामदास आठवले यांच्यावर काँग्रेसचा निशाण
BJP Leader | (Photo Credit: Twitter)

रेमडेसिवीर (Remdesivir) औषध तुटवड्यावरुन केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष नुकताच पाहायला मिळाला. या नंतर आता काँग्रेसनेही या वादात उडी घेतली असून, दिल्लीत केंद्रीय मंत्री असलेल्या महाराष्ट्रातील नेत्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवरुन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), रेल्वे मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal), माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar), केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale), केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve), आणि संजय धोत्रे यांचे फोटो ट्विट करत “दिल्लीची हुजरेगिरी करून मातृभूमीची बदनामी करणारे हे केंद्र सरकारमधील महाराष्ट्रद्रोही मंत्री महाराष्ट्राच्या काय कामाचे?,” असा सवाल विचारला आहे. काँग्रेसच्या ट्विटरनंत पुन्हा एकदा राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.

राज्यात कोरोना व्हायरस संसर्गाची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असताना लस आणि रेमीडिसीवीर औषधांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. अशात काल (17 एप्रिल) राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला. महाराष्ट्राला आवश्यक असलेले रेमडेसिवीर पुरवू नका अन्यथा तुमचा परवाना रद्द केला जाईल, असा दबाव केंद्र सरकारने औषध कंपन्यांवर टाकल्याचे मलिक यांनी म्हटले होते. मलिक यांच्या आरोपाला केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी उत्तर दिले. दरम्यान, आता या वादात काँग्रेसनेही जोरदार उडी घेतली आहे. (हेही वाचा, Coronavirus: मृत्यू प्रमाणपत्रांवरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छापा- नवाब मलिक)

काय म्हटले आहे काँग्रेसने?

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, रेल्वे मंत्री पीयूष गोयल, माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आणि संजय धोत्रे यांचे फोटो ट्विट करत काँग्रेसने म्हटले आहे की, ''ऑक्सीजन तुटवड्यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क केला असता 'ते बंगालच्या प्रचारात व्यस्त आहेत' असं उत्तर देण्यात येतं, रेमडेसिवीर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना पुरवठा करू नका सांगितलं जातं. दिल्लीची हुजरेगिरी करून महाराष्ट्राची बदनामी करणारे हे मंत्री आपल्या काय कामाचे?''

नवाब मलिक यांच्या आरोपला उत्तर देताना केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले होते की, महाराष्ट्रात स्वार्थी महाविकासआघाडी सत्तेत आली आहे. त्यामुळेच जनतेला सगळे भोगावे लागत आहे. दरम्यान, प्रकाश जावडेकर यांनीही मागे एकदा पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. नितीन गडकरी, रामदास आठवले यांच्यासह अनेक कंद्रीय मंत्र्यांनी महाराष्ट्रावर वारंवार टीका केली आहे. त्यावरुन काँग्रेसने ट्विट करत केंद्रीय मंत्र्यांवर निशाणा साधला आहे.