Congress Padyatra: कॉंग्रेस 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात काढणार पदयात्रा; ‘जनविरोधी’ निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणार
Congress | (File Image)

केंद्र सरकारच्या ‘जनविरोधी’ निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आपण पदयात्रा (Padyatra) काढणार असल्याचे महाराष्ट्र काँग्रेसचे (Maharashtra Congress) अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सोमवारी सांगितले. पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले की, ‘संविधान वाचवा, देश वाचवा’ असा संदेश देणारी ही रॅली प्रत्येक जिल्ह्यात 75 किमीचा प्रवास करणार आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने घेतलेल्या जनविरोधी निर्णयांवर या रॅलीतून प्रकाश टाकला जाणार आहे.

यासोबतच जीवनावश्यक वस्तूंवर वस्तू आणि सेवा कर (GST) लावणे असो, सशस्त्र दलाची अग्निवीर योजना असो किंवा वाढती महागाई असो असे अनेक मुद्दे जनतेसमोर आणले जातील असे काँग्रेस नेते म्हणाले. महात्मा गांधींनी 9 ऑगस्ट रोजी ‘भारत छोडो’ ची हाक दिली होती. आता काँग्रेस ‘संविधान वाचवा आणि देश वाचवा’ चा नारा देईल आणि प्रत्येक तालुक्यामध्ये आणि गावात या विचाराचा प्रसार करेल, असे ते म्हणाले.

यावेळी पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले की, ‘2014-2019 या काळात लाखो रुपयांची उधळपट्टी फडणवीसांनी केली. महाराष्ट्र हे एक पुरोगामी राज्य होते मात्र आता एक नवीन सरकार स्थापन करून भाजपने घटनाकार बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्मभूमीतच संविधानाला गाढण्याचे काम केले आहे. या सर्व गोष्टींचा आवाज कॉंग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जाईल.’ ते पुढे म्हणाले, ‘प्रत्येक स्तरातून प्रयत्न करत आमचा देश, देशातील एकता, देशाचे संविधान वाचवण्याचे काम केले जाईल. यातून ‘भारत तोडो’च्या ऐवजी ‘भारत जोडो’ हा संदेश देण्यात येईल.’ (हेही वाचा: बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षातील एकी कायम ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे करणार महाराष्ट्र दौरा)

कॉंग्रेसच्या उदयपुरच्या बैठकीमध्ये जे निर्णय घेण्यात आले त्याच्या अंमलबजावणीसाठी शिर्डीमध्ये कॉंग्रेस नेत्यांमध्ये चर्चा झाली. या चर्चेनंतर राज्यातील कॉंग्रेस नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अशोक चव्हाण यांनी राज्यात राजकीय समीक्षा समितीची स्थापना होणार असल्याची माहिती दिली. आगामी निवडणुकांमध्ये समविचारी पक्षांची आघाडी करण्यासाठी जिल्हास्तरीय परिस्थितीची समीक्षा करण्यासाठी ही समिती मदत करेल.