चंद्रपूर (Chandrapur) येथील काँग्रेस खासदार (Congress MP) सुरेश धानोरकर (Suresh Dhanorkar) यांनी पक्षाला पुनरुज्जीवीत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे. काँग्रेस पक्षात तरुणांना वाव दिल्यास पक्षाचे पुनरुज्जीवन होईल, असा विश्वास ते व्यक्त करतात. धानोरकर सांगतात की, पक्ष नेतृत्वाने निवडणूक लढून निवडूण येण्याची क्षमता असलेल्या 70% तरुण उमेदवारांना संधी दिल्यास काँग्रेसमध्ये मोठा बदल घडू येईल. काँग्रेस पक्षाचे अधिकाधिक खासदार निवडूण येतील. तसेच, केवळ 30 टक्के ज्येष्ठ नेत्यांनाच निवडणुकीचे तिकीट पक्षाने द्यावे, अशी भूमिकाही धानोरकर मांडतात.
खा. सुरेश धानोरकर यांनी लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत ही भूमिका व्यक्त केली आहे. खा. धानोरकर यांनी म्हटले की, काँग्रेसला पुनरुज्जीवीत करण्यासाठी पक्षाच्या धोरणात, रणनितीत आणि उमेदवार निश्चितीत अमूलाग्र बदल करायला हवा. दरम्यान, आपण संघटनात्मक पातळीवर जबाबदारी स्वीकारावी अशीही पक्षाचे मत होते. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सहा विधानसभा मतदारसंघात काम करायचे आहे. त्यामुळे आपण ही जबाबदारी घेणे टाळले, असेही धानोरकर यांनी या वेळी सांगितले.
पुढे बोलताना धानोरकर म्हणाले की, काँग्रेस पक्ष तळागाळात पोहोचलेला आहे. त्यामुळे खेडोपाडी, शहर, गाव अशा सर्व ठिकाणी काँग्रेसचा मतदार आहे. अशा वेळी निवडूण येण्याची क्षमता असलेला आणि स्वबळावर किमान 40 हजार मते घेऊ शकणाऱ्या तरुण व्यक्तिलाच उमेदवारी दिल्यास काँग्रेसमध्ये अमुलग्र बदल होईल. असे घडल्यास येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चित आहे, असा विश्वासही धानोरकर यांनी व्यक्त केला. (हेही वाचा, नारायण राणे हे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत, त्यांना काही कामधंदा उरलेला नाही- गुलाबराव पाटील)
काँग्रेस पक्षाची भाजप विरुद्धची लढाई विचारांची लढाई आहे. त्यामुळे भाजपला निवडणुकीत पराभूत करायचा असेल तर काँग्रेसला आपली पारंपरीक रणनिती आणि धोरण बदलावे लागेल. त्यासाठी निवडूण येण्याची क्षमता ओळखून उमेदवारी देण्यासोबतच मतांचे विभाजनही टाळावे लागेल, असेही धानोरकर यांनी सांगितले.
काँग्रेस पक्षात शक्यतो आयारामांना फारशी संधी लवकर मिळत नाही. काँग्रेस निष्ठावान कार्यकर्त्यांनाच संधी देते. अनेक ठिकाणी तर सात-आठ वेळा एकाच उमेदवाराला संधी देते. त्यामुळे नव्या कार्यकर्त्याला संधी मिळत नाही. परिणामी तो नाराज होतो. कधी कधी तर उमेदवार निवडूण येण्याची खात्री नसते. हा उमेदवार निवडूण येणार नाही हे माहित असते तरीही त्याला तिकीट दिले जाते, त्याचा परिणाम पक्षाच्या कामगिरीवर होतो. दुसऱ्या बाजूला भाजपचे वेगळे आहे. ते केवळ सत्तेचा विचार करतात. त्यांना कोणत्याही पक्षातून निवडूण आलेला उमेदवार चालतो. ते केवळ निवडूण येणारा चेहरा शोधतात, अशी टीकाही धानोरकर यांनी या वेळी केली.