सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरुन पत्रकार परिषद घेत भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी ठाकरे सरकारवर शाब्दीक हल्लाबोल केला होता. दरम्यान, पैसे कमवणे हा शिवसेना पक्षाचा एकमेव धंदा आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली होती. या टीकेला शिवसेना नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नारायण राणे हे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत, त्यांना काही काम धंदा उरलेला नाही, ते घडीत काही बोलतात, नंतर काहीतरी बोलतात. बोललल्याशिवाय त्यांच्याकडे कुणी लक्ष देत नाही म्हणून ते तोच प्रयत्न करतात. ते जेव्हा मुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांनी कोकणासाठी किती प्रकल्प आणले? असाही प्रश्न गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला आहे.
नारायण राणे यांनी केलेल्या टिकेला प्रत्युत्तर देताना गुलाबराव पाटील म्हणाले आहेत की, ज्यावेळी नारायण राणे शिवसेना पक्षात होते. तेव्हा पक्षाने त्यांच्यासाठी खूप काही केले आहे. शिवसेना पक्षामध्ये असताना ते मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचले होते. परंतु, तरीही त्यांनी कोकणासाठी काहीच केले नाही. त्यामुळे कोकणासाठी कुणी काय केले? यावर त्यांनी बोलूच नये. नारायण राणे प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशी वक्तव्यं करत असतात अशीही टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे. हे देखीव वाचा- Shivaji Maharaj Statue In Karnataka: बेळगावातील रातोरात हटवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 8 दिवसात बसवणार; कर्नाटक सरकारचं आश्वासन
नारायण राणे यांनी शनिवारी विजयदुर्ग किल्ल्याची पाहणी केली होती. चार दिवसांपूर्वी या किल्ल्याची तटबंदी अतिवृष्टीमुळे कोसळली होती. या पाहणी दौऱ्यात राणेंसोबत त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे, माजी आमदार अजित गोगटे हेही सोबत होते. पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना राणे म्हणाले होते की, दोन दिवसांपूर्वी नाणारमधील काही लोकांनी नाणार प्रकल्पाला समर्थन दिले. त्यात 80 टक्के शिवसैनिक होते. पैसे कमावणे हा शिवसेनेचा एकमेव धंदा आहे. बोलण्यात काय बदल करतील हे सांगू शकत नाही. पूर्वी विरोध केला आणि आता समर्थन करत आहेत. हे शिवसेनेचे घुमजाव आहेत. ही स्थानिक जनतेची फसवणूक आहे, असे नारायण राणे म्हणाले होते.