Shivaji Maharaj Statue In Karnataka: बेळगावातील रातोरात हटवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 8 दिवसात बसवणार; कर्नाटक सरकारचं आश्वासन
Shivaji Maharaj Statue (PC - wikimapia.com)

Shivaji Maharaj Statue In Karnataka: बेळगावातील रातोरात हटवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Shivaji Maharaj Statue) 8 दिवसात बसवणार असल्याचं आश्वासन कर्नाटक (Karnataka) सरकारने दिलं आहे. आज यासंदर्भात पार पडलेल्या बैठकीत शिवरायांचा पुतळा सन्मानपूर्वक बसविण्याचा निर्णय वरिष्ठ पोलीस अधिकारी, तहसीलदार आणि गावातील पंचांनी घेतला.

दरम्यान, कर्नाटक सरकारने शिवरायांचा पुतळा रातोरात हटवल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यानंतर कर्नाटक सरकारने याबाबत महत्तवपूर्ण निर्णय घेतला आहे. (हेही वाचा - छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची सन्मानपूर्वक पुनर्स्थापना करावी; महाराष्ट्राचे सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांची कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांच्याकडे पत्राद्वारे मागणी)

बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात 5 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. मात्र, पुतळा हटवण्यासाठी पोलिसांनी दबाव आणला होता. मनगुत्ती येथील नागरिक यासाठी रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर याठिकाणी पुतळा बसवण्यात आला होता. परंतु, हाच पुतळा कर्नाटक सरकारने रातोरात हटवला आहे. या घटनेनंतर राज्यात मोठ्या प्रमाणात पडसाद उमटले.

कर्नाटक सरकारच्या मनमानी कारभारामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली. दरम्यान, आज महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर कोल्हापुरातील शिवसैनिकांनी या घटनेचा निषेध करत आंदोलन केलं. याशिवाय नागपुरातदेखील शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन केलं.