Representational Image (Photo Credits: PTI)

कोविड-19 (Covid-19) च्या पार्श्वभूमीवर बंद असलेली राज्यातील महाविद्यालये उद्या 15 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत.. मात्र मुंबई (Mumbai) आणि उपनगरातील महाविद्यालयं तुर्तास तरी सुरु करण्यात येणार नसल्याचं मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) स्पष्ट केले आहे. 22 फेब्रुवारीपर्यंत शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन त्यानंतर महाविद्यालयं सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, उद्यापासून राज्यातील महाविद्यालयं सुरु होत असल्याचा निर्णय 3 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आला होता.

महाविद्यालये सुरु करण्याबाबत राज्य सरकारने निर्णय जाहीर केला असला तरी कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे. त्यानुसार मुंबई महापालिका आयुक्तांनी मुंबई विद्यापीठाला पत्र पाठवले असून त्यात 22 फेब्रुवारीपर्यत कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन महाविद्यालयं सुरु करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असं सांगण्यात आलं आहे. (Maharashtra Colleges and Universities: महाराष्ट्रातील महाविद्यालये आणि विद्यापीठे 50 टक्के विद्यार्थ्यांसह 15 फेब्रुवारीपासून सुरु होणार)

राज्य सरकारच्या नियमावलीचे पालन करुन राज्यभरातील महाविद्यालये उद्यापासून सुरु होणार आहेत. मात्र मुंबई आणि उपनगरातील महाविद्यालये तुर्तास बंदच राहणार आहेत. तसंच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागातील महाविद्यालयं सुरु करण्याबाबत स्थानिक प्रशासनाने अद्याप कळवलेले नाही. (Varsha Gaikwad On Mumbai Local: शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड घेणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट, विद्यार्थ्यांना मुंबई लोकल प्रवासाची मिळू शकते मुभा)

दरम्यान, 1 फेब्रुवारी पासून सर्वसामान्यांसाठी लोकलसेवा सुरु करण्यात आली आहे. या प्रवासासाठी वेळेची मर्यादा घालून देण्यात आल्या आहेत. तसंच विद्यार्थ्यांना मुंबई लोकल प्रवासाची परवानगी मिळावी म्हणून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती.