Varsha Gaikwad On Mumbai Local:  शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड घेणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट, विद्यार्थ्यांना मुंबई लोकल प्रवासाची मिळू शकते मुभा
Varsha Gaikwad | (Photo Credits-Facebook)

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मुंबई लोकलमधून (Mumbai Local) प्रवास करण्याची मुभा द्यावी यासाठी शिक्षणमंत्री (Education Minister) वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची भेट घेणार आहेत. येत्या 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरु होत आहेत. त्यामुळे मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी लोकल प्रवास आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. सुरु होत असलेली महाविद्यालये, मुंबई येथील आझाद मैदान येथे सुरु असलेली आंदोलने आदी पार्श्वभूमीवर त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

वर्षा गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आझाद मैदानावर आंदोलन सुरु आहे. या आंदोलकांच्या मागण्यांबाबत दोन दिवसांमध्ये योग्य तो निर्णय घेतला जाईल. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा झाली आहे. आंदोलकांच्या मागण्या विचारात घेऊन आर्थिक तरदूद देण्यात यावी अशी मागणी मी या चर्चेवेळी केली आहे. (हेही वाचा, SPPU Exam 2021 Pattern: यंदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या सार्‍या सत्राच्या परीक्षा यंदा Online, MCQ स्वरूपामध्ये होणार)

येत्या 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालेय सुरु होणार असल्याची माहिती राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गेल्याच आठवड्यात दिली होती. ही माहिती देताना हा निर्णय राज्यातील कुलगुरुंशी चर्चा करुन महाविद्यालये सुरु करण्याबाबत निर्णय झाल्याचे सामंत यांनी म्हटले होते.

दरम्यान, महाविद्यालये सुरु होत असली तरी आसनक्षमतेच्या 50% इतकीच उपस्थिती सुरुवातीला सुरु करण्यास परवानगी आहे. पुढे विद्यालये आणि वसतीगृहे टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येतील असेही सांगण्यात आले होते. शिवाय विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन घ्यायच्या याबाबत संबंधीत विद्यापीठांनी निर्णय घ्यावा असे सांगण्यात आले होते.

दुसऱ्या बाजूला शहरांमध्ये शिकणारे परंतू कोरोना आणि लॉकडाऊन काळात आपल्या मूळ गावी खेडोपाड्यांमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षण ऑनलाईन घ्यायचे आहे की ऑफलाईन याचा अधिकार विद्यार्थ्यांना असणार आहे. शिवाय वसतीगृहांचे स्ट्रक्चरल ऑडीट, फायर ऑडिट झाल्यावरच ती सुरु करण्यात येतील असेही शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.