कोरोना व्हायरस संसर्गाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज पुणे दौरा
CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Twitter)

पुणे (Pune) शहरातील कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आज (गुरुवार, 30 जुलै) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) पुण्याचा दौरा करणार आहेत. त्यासाठी आज सकाळी 9 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुणे दौऱ्यासाठी रवाना होतील. या दौऱ्यात मुख्यमंत्री पुण्यातील वाढत्या कोरोना व्हायरस संसर्गाच्या परिस्थिती आणि कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घेण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतील. यासाठी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेतली जाईल.

दरम्यान, राज्य सरकारकडून पुण्यावर अन्याय होत असल्याची टीका विरोधकांकडून होत होती. भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी "हे सरकार मुंबई इतकं पुण्याकडे लक्ष देत नाही. पुण्यावर अन्याय केला जात आहे. पुण्यात क्वारंटाईन सेंटर, आयसीयू बेड्स वाढवण्याची गरज आहे. तसंच पुणे, पिंपरी महानगरपालिकेला अद्याप एका पैशाचंही अनुदान मिळालेलं नाही," अशी जोरदार टीका केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. (महाराष्ट्रामधील लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढवला; मुंबई, पुणे आणि इतर शहरांमध्ये मॉल व मार्केट कॉम्प्लेक्स उघडण्यास परवानगी, जाणून घ्या काय असेल सुरु)

कसा असेल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुणे दौरा?

# आज सकाळी 9 वाजता पुण्याला रवाना होतील.

# पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात दुपारी 12.15 वाजता लोकप्रतिनीधींसमवेत बैठक होईल.

# दुपारी 2.30 वाजता सर्व प्रशासकीय यंत्रणांसोबत बैठक होईल.

# संध्याकाळी 5 वाजता मुख्यमंत्री मुंबईच्या दिशेने रवाना होतील.

कोरोना व्हायरस संसर्गाचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या बैठकांमध्ये  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सह उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री उजित पवार, मुख्य सचिव संजय कुमार आणि इतर लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतील.

दरम्यान, पुण्यातील कोरोना बाधितांचा आकडा 39,125 वर पोहचला आहे. त्यापैकी 16,427 रुग्णांची प्रकृती सुधारली असून 1,097 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील कोरोना बाधितांच्या संख्येत पुण्याचा तिसरा क्रमांक आहे.