PM Modi And CM Thackeray (Photo Credits: Facebook/Twitter)

महाराष्ट्रात कोरोनाने हाहाकार माजविला असून यातून राज्याला वाचवणे हे एकच उद्दिष्ट्य राज्य सरकारपुढे आहे. या लढाईत रेमडेसिवीर (Remdesivir) औषधाचा साठा अपुरा पडत असल्याचे राज्य सरकारचे म्हणणे होते. त्यासाठी केंद्र सरकारला (Central Government) मदतीसाठी वारंवार विनंती करण्यात आली. या सर्वांचा पाठपुरावा करत केंद्र सरकारने अखेर राज्यात 30 एप्रिलपर्यंत 4 लाख 35 हजार व्हायल्सचा पुरवठा देण्याचे आदेश काढले आहेत. केंद्र सरकारने दिलेल्या मंजूरीमुळे राज्य सरकारला कोरोना विरुद्ध लढण्यात मोठी मदत होणार आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे आभार मानले आहेत. अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

केंद्र सरकारने येत्या 30 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात 4,35,000 रेमडेसिवीर औषधांच्या पुरवठ्यास मंजूरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.हेदेखील वाचा- COVID-19 Vaccine: महाराष्ट्रात सर्वांना मोफत लस कधी मिळणार? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली महत्वाची माहिती

दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत केंद्र सरकारचे कौतुक केले आहे. "केंद्र सरकारने आश्वासित केल्याप्रमाणे अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला रेमडेसिवीरचे सर्वाधिक वितरण केलं आहे. नव्याने वितरण जाहीर झालेल्या 5 लाखांपैकी महाराष्ट्राला 1,65,800 अर्थात 34 टक्के रेमडेसिवीर दिलं आहे. आतापर्यंतच्या एकूण 16 लाख रेमडेसिवीरपैकी 4,35,000 आणि तेही केवळ 10 दिवसांसाठी!," असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

राज्यात गेल्या 3 दिवसांत तब्बल 2 हजार 17 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे कळत आहे. यामुळे संपूर्ण राज्यात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.महाराष्ट्रात कोरोनामुळे गुरुवारी (22 एप्रिल) 568 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर या आकड्यात आणखी भर पडली असून शुक्रवारी (23 एप्रिल) तब्बल 773 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दरम्यान, आजही कोरोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांची संख्या जास्तच आहे. राज्यात आज 676 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील ही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे.