Ajit Pawar (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्रात (Maharashtra) एकिकडे कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तर, राज्यात दुसरीकडे रेमडेसिविर, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, काही भागात लसीचे डोस (Corona Vaccine) यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचपार्श्वभूमीवर राज्य सरकारने 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कोरोना लसीचे डोस अपुरे पडत असल्यामुळे या वयोगटातील सधन नागरिकांना लस विकत घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याचबरोबर राज्यातील गरिबांना मोफत लस देण्यासंदर्भात येत्या 1 मे रोजी निर्णय घेतला जणार आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत.

कोरोना संसर्गाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला आहे. त्यावेळी त्यांनी मोफत कोरोना लसीकरणाबाबत भाष्य केले आहे. दरम्यान ते म्हणाले की, राज्यातील जनतेला मोफत लस मिळण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 1 मे रोजी त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत. याचबरोबर पूनावाला म्हणाले की, आत्ता मी तुम्हाला इतकी लस देऊ शकणार नाही. माझ्या क्षमतेप्रमाणे तुम्हाला लस देईन. उरलेली लस तुम्ही इतर कंपन्यांकडून घ्या, असेही ते म्हणाले आहेत. सध्या ते इंग्लंडला गेले आहेत. ते भारतात परत आल्यानंतर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू, असे अजित पवार म्हणाले आहेत. हे देखील वाचा- राज्यातील रेमिडेसिव्हर इंजेक्शनचा साठा 36 हजारांवरुन अवघ्या 25 हजारांवर पोहचला- उपमुख्यमंत्री अजित पवार

ट्विट-

महाराष्ट्रात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण राज्यात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात दररोज तब्बल 50 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होऊ लागली आहे. तसेच मृतांच्या आकडाही वाढला आहे. राज्यात सध्या 7 लाखाहून अधिक रुग्ण सक्रीय आहेत.