मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आज (शुक्रवार) नाशिक (Nashik) आणि नंदुरबार (Nandurbar ) जिल्ह्यांचा दौऱ्यावर आहेत. सकाळी साधारण 10.30 वाजता ते मोलगी आणि धडगाव येथील आरोग्य केंद्रांची पाहणी करणार आहेत. ही आरोग्य केंद्रे नंदुरबार जिल्ह्यातील सातपूडा डोंगर रांगांमध्ये आहेत. प्राप्त माहितीनुसार उद्धव ठाकरे हे आपल्या दौऱ्याची सुरुवात नाशिक जिल्ह्यातील ओझर येथून सुरु होणार आहे. ओझर येथून ते थेट मोलगी आणि धडगावला जाणार आहेत.
ओझर येथून मोलगी आणि धडगावला गेल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे हे स्थानिक नागरिकांशी सवाद साधणार आहेत. त्यानंतर ते वन विभागाच्या रोपवाटीकेला भेट देतील. रोपवाटीकेला भेट देण्यापूर्वी ते सुरवनी येथील वीज वितरण उपकेंद्राच्या कामाची पाहणी करतील. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते रुग्णालयांमध्ये देण्यात येत असलेल्या कोरोना लसीकरणाबाबत माहिती घेतील. त्यानंतर दौरा ओटोपता घेऊन ते मुंबईला रवाना होतील. (हेही वाचा, कोविड-19 रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्त्वाची बैठक; लसीकरणासंदर्भात दिले 'हे' निर्देश)
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात कोण?
- मुख्य सचिव सीताराम कुंटे
- प्रधान सचिव (आरोग्य) डॉ. प्रदीप व्यास
- शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर
दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यात आज वातावरण ढगाळ आहे. त्यामुळे त्याचा परिणाम मुख्यमंत्री ठाकरे यांच्या दौऱ्यावर होणार का याबाबात स्पष्टता नाही. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा हेलिकॉप्टरद्वारे होणार आहे. त्यामुळे ढगाळ वातावरणामुळे हेलिकॉप्टर उड्डाणास अडचण आल्यास दौऱ्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत माहिती देताना हा दौरा नियोजित वेळेनुसारच पार पडेल, असे प्रशासनाने म्हटले आहे.