Eknath Shinde, Tanaji Sawant | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पुणे महानगरपालिका आरोग्य, वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान पवार आणि पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांची तातडीने बदली करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वैद्यकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडाली आहे. राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, हे दोन्ही अधिकारी आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या खास मर्जीतील होते. त्यामुळे ते मनमानी कारभार करत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांना या कारभाराची कुणकुण लागताच त्यांनी तातडीने या बदल्या केल्याचे समजते.

सहाय्यक संचालक आरोग्य सेवा अंधत्व नियंत्रण कार्यक्रम डॉ. भगवान पवार यांची मुंबई येथील आरोग्य सेवा औद्योगिक विभागाचे सहाय्यक संचालक पदावर डॉ. रामचंद्र हंकारे यांची बदली करण्यात आली आहे. राज्य सरकारचे अवर सचिव व.पां. गायकवाड यांनी हे आदेश काढले आहेत. हंकाले आणि पवार यांची अनुक्रमे अवघ्या तीन आणि पाच महिन्यात बदली करण्यात आली आहे. हे दोन्ही अधिकारी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या विशेष मर्जीतील म्हणून अल्पावधीतच ओळखले गेले. इतकेच नव्हे तर काही प्रकरणांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश डावलून त्यांनी केवळ आरोग्यमंत्र्यांच्या आदेशाने कारभार केल्याचे समजते. या बदल्यापाठीमागे केवळ सावंत यांची मर्जीच नव्हे तर नव्यानेच सरकारमध्ये सहभागी झालेल्या अजित पवार यांनी पुणे जिल्ह्याच्या कारभारात घातलेले विशेष लक्षही कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.

पुण्याच्या राजकी वर्तुळात आणखीही एक चर्चा आहे ती म्हणजे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन यांनी तब्बल 10 लाख रुपयांची लाच घेतल्याचे प्रकरण नुकतेच चर्चेत आले होते. हे प्रकरणच डॉ. भगवान पवार यांना भोवले आहे. ते 11 मार्च 2023 रोजी दोन वर्षांच्या नियुक्तीवर आले होते. मात्र त्यांची काही महिन्यांतच उचलबांगडी झाली.