शालेय विद्यार्थी (प्रातिनिधिक फोटो ) Photo Credits : PTI

महाराष्ट्रामध्ये दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने सार्‍याच क्षेत्रावर त्याचे दूरगामी परिणाम दिसत आहेत. त्याला शालेय विद्यार्थी देखील अपवाद नाहीत. यंदा कोरोना व्हायरस जागतिक आरोग्य संकटामध्ये शैक्षणिक वर्षाचं वेळापत्रक देखील कोलमडलं आहे. दरम्यान केंद्र सरकारने अनलॉक 4 ची नियमावली जारी करत 9वी ते 12वीचे वर्ग खबरदारी घेत सुरू करण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र महाराष्ट्रात सप्टेंबर अखेरीस शाळा सुरू होऊ शकत नाही असे शालेय मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

शालेय शिक्षण मंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच मीडियाशी बोलताना शाळा यंदा दिवाळीनंतर सुरू करण्यासाठी परिस्थिती पाहून विचार केला जाऊ शकतो असे संकेत दिले होते. त्यामुळे महाराष्ट्राच्या अनलॉक 4 अंतर्गत मिशन बिगिन अगेनच्या नियमावलीमध्ये अद्याप शाळा, कॉलेज, कोचिंग क्लास सुरू करण्याला परवानगी दिलेली नाही.

एबीपी माझाच्या वृत्तानुसार, राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत शाळा पुन्हा सुरू करण्याबद्दल चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल. दरम्यान सध्या तरी या विषयाबाबत अनेकांची मतं प्रतिकूल आहे. महाराष्ट्रात रूग्णसंख्या वाढत असताना विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजमध्ये बोलावणं धोकादायक आहे. त्यामुळे हा निर्णय आता होऊ शकत नाही. केंद्र सरकारने 21 सप्टेंबर पासून 9-12वी चे वर्ग सुरू करण्यासाठी विशेष नियमावली जारी केली आहे.

दरम्यान महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून झपाट्याने कोरोना रूग्णसंख्या वाढत आहे. सुरूवातीला शहरी भागात वाढणारा कोरोना आता ग्रामीण भागात पसरत आहे. यापार्श्वभूमीवर दूरदर्शनवर टिली मिली या मालिकेतून तसेच अनेक ठिकाणी व्हर्च्युअल माध्यमातून शिक्षण सुरू आहे.