Citizenship Amendment Act: नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन ईशान्य भारतात जोरदार आंदोलन केली जात आहेत. मात्र महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या सरकारने हा कायदा लागू करावा अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली आहे. त्यासाठी भाजप शिवसेनेसोबत तडजोड करण्यास तयार असल्याचे ही म्हटले आहे. आशिष शेलार त्यावेळी नाशिक येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
केंद्र सरकारचे मांडलेले नागरिकत्व सुधारणा विधेयकाला संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिली. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर त्याचे कायद्यात रुपांतर झाले आहे. तर नागरिकत्व सुधारणा कायदा हा महाराष्ट्रात लागू होणार की नाही याचा पेच कायम आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाने या कायद्याचा विरोध केला आगे. मात्र याच शिवसेनेने यावर आपली भुमिका मांडली नसल्याची संधी साधत भाजपने त्यांना खुली ऑफर दिली आहे.
महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी यांचे महाविकासआघाडीचे सरकार आहे. मात्र शिवसेनेने त्यांचे सरकार वाचवण्यासाठी देशाच्या हिताकडे दुर्लक्ष करु नये असा टोला लगावण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेने कोणालाही न घाबरता त्यांचा मूळ बाणा काय आहे तो दाखवावा असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे. तर भाजपने सत्ता आणि सत्तेसाठीच कधीच राजकरण केले नव्हते. तर घुसखोरांना घालवावं हिच आमची भुमिका राहिली असल्याचे ही शेलार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचे मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा विधान केले आहे. त्यांनी मीडियाला दिलेल्या विधानात असे म्हटले आहे की, जर महाराष्ट्रात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्यास तर आम्ही पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या निर्णयाचे पालन करणार आहोत. त्याचसोबत छत्तीसगढ राज्याने सुद्धा नागरिकत्व सुधारणा कायद्याचा विरोध करण्याचे संकेत दिले आहे. यामध्ये एकूण 6 असे राज्य आहेत जे थेट या कायद्याचा विरोध करताना दिसून येत आहेत. तर मध्य प्रदेश मुख्यमंत्री कमलनाथ यांनी यावर असे म्हटले आहे की, काँग्रेस पक्ष जो काही निर्णय घेईल त्याचे आम्ही पालन करणार आहोत.