प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Instagram )

मुंबईप्रमाणे आता झपाट्याने नवी मुंबईचा देखील विकास होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना परवडणार्‍या दरात आता अधिकाधिक घरं उपलब्ध करून देण्यासाठी 'सिडको'कडून 2.10 लाख घरं सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ( Pradhan Mantri Awas Yojna) उपलब्ध करून दिली जाणार आहेत. काही दिवसांपूर्वीच नवी मुंबईत सिडकोकडून 95,000 नवी घरं बांधली जाणार आहेत याची माहिती देण्यात आली होती. आता त्यापैकी 9249 घरांच्या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र आता यामध्ये अजून 1 लाख 10 हजार घरं उपलब्ध करून दिली जातील अशी माहिती सिडकोकडून देण्यात आली आहे. CIDCO Lottery 2019 Registration: नवी मुंबई मध्ये 'सिडको' च्या 9249 घरांसाठी नोंदणीला होणार सुरूवात; lottery.cidcoindia.com वर अर्ज उपलब्ध

 

नवी मुंबईमध्ये पावणे, तुर्भे, बोनसरी, शिरवणे आणि कुकशेत या एमआयडीसी भागांमध्ये सिडको आता नवी घरं बांधणार आहेत. सध्या सिडकोने दिलेल्या जाहिरातीतील 1 लाख 10 हजार घरांपैकी 62,976 घरं आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील लोकांसाठी तर 47,040 घरं अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. नवी मुंबईतील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत केंद्र सरकार देशातील प्रत्येकाला हक्काचं घर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानुसार, 31 मार्च 2022 पर्यंत देशात 20 मिलियन घरं सामान्यांना परवडतील अशा दरात उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.

नवी मुंबईमध्ये लवकरच आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होणार आहे. तसेच मेट्रो सारख्या सुसज्ज सुविधा उपलब्ध होणार असल्याने नवी मुंबईमध्ये घरं घेण्याकडे अनेकांचा ओढा वाढला आहे. प्रायव्हेट बिल्डर्ससोबत आता सिडकोदेखील सामान्यांना मोठे गृहप्रकल्प उपलब्ध करून देत आहे.