केंद्राला घाबरायचं की लढायचं? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सोनिया गांधी यांच्यासोबतच्या बैठकीत  रोखठोक विधान
Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी रोखठोक भाष्य केले. केंद्र सरकारला घाबरायचे आहे की, त्यांच्यासोबत लढायचे आहे. याचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. आपलं पाप आणि त्यांचं पुण्य अशी केंद्राची भूमिका असल्याचा टोलाही उद्धव ठाकरे यांनी या वेळी लगावला. सोनिया गांधी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे झालेल्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि बिगर भाजप शासित (Non BJP Government) राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्या विधानाची देशभरात चर्चा होण्याची शक्यता आहे.

या वेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, केंद्र सरकार आपल्या विरोधी पक्षाचे आहे याचा अर्थ ते इतर पक्षांबद्दल वाईट विचार करतात असे नाही. ते देखील सर्वसामान्यांचेच प्रतिनिधी आहेत. आपण केंद्राकडे काही मागतो याचा अर्थ आपण त्यांच्याकडे भीक मागतो असे नाही. आपण आपले हक्क मागत असतो, असेही उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, केंद्र सरकारसोबत आपल्याला लढायचे आहे की घाबरायचे आहे हे एकदा ठरवायला हवे. नाहीतर आपण नियमीतपणे भेटत जाऊ आणि याबाबतच चर्चा करत राहू. जर लढायचे असेल तर ते आपण कोणतीही किंमत मोजून केले पाहिजे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. (हेही वाचा, Hindu Succession Act Amendment 2005: वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा हक्क अबाधित, पालक वा मुलगी हयात नसल्यास वारसांना करु शकणार दावा- सर्वोच्च न्यायालय)

आजची स्थिती पाहता एकचालकानुवर्ती स्थिती आहे. संपूर्ण सत्ता केवळ एका व्यक्तिच्या हातात असल्याचे चित्र आहे. असे असेल तर राज्य सरकारची आवश्यता काय. आपण जर राज्यघटनाच माणनार नसू तर मग लोकशाही कुठे राहिली? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. जनतेचा आवाज कोणीही दाबू शकत नाही. जर कोई तो दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण तो बुलंद केला पाहिजे, असेही उद्धव ठाकरे यांनी या वेळी ठणकाऊन सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी या बैठकीवेळी अमेरिकेचे उदाहरण दिले. ते म्हणाले, अमेरिकेत शाळा सुरु केल्या. त्यानंतर जवळपास 97 हजार विद्यार्थ्यांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला असे अहवाल सांगतो. आपल्याकडे अशी स्थिती निर्माण झाली तर काय करणार आहोत आपण? त्यामुळे लॉकडाऊन शिथील करण्यात येत आहेत. मात्र, असे असले तरी शाळा अद्यापही बंद ठेवण्याचाच निर्णय घेण्यात आल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. कोरोना व्हायरस संकट टाळण्यासाठी आपण समोरासमोर चर्चा करु आणि जे काही करायचं आहे ते एकत्र येऊनच करु असेही उद्धव ठाकरे म्हणाले.