शिवसेना-भाजप युती: सोबत या अन्यथा आमचे उमेदवार उभे करु; देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (संग्रहित आणि संपादित प्रतिमा)

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी आघाडी करुन निवडणुका लढविण्याचे जवळपास नक्की केले. काही जागांचा अपवाद वगळता बोलणीही पूर्ण झाली. या पार्श्वभूमिवर सत्ताधारी भाजप, शिवसेनेत मात्र युतीवरुन अद्याप कोणताच निर्णय जाहीर झाला नाही. त्यातच शिवसेनेने आगोदरच 'एकला चलो रे'चा नारा दिल्याने भाजपच्या गोटात सावधगिरी बाळगली जात आहे. या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला थेट शब्दांत इशारा दिला आहे. मित्र पक्षांनी सहकार्य केल्यास आम्ही त्यांचे उमेदवार खासदार म्हणून दिल्लीत पाठवू. अन्यथा शिरुर येथून आमचे उमेदवार उभे करु, असे सूचक वक्तव्य फडणवीस यांनी केले आहे.

पुणे जिल्ह्यात मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघात अटल संकल्प मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. दरम्यान, शिवसेनेने युती करुन भाजपसोबत यावे असे भाजपच्या अनेक नेत्यांनी या आधीच स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही खासगी वृत्तवाहिण्यांना दिलेल्या मुलाखतींमध्ये शिवसेना आमचा परंपरागत मित्र आहे. त्यामुळे हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर आमची युती होईल असे सांगत युतीबाबत अनुकूल मत व्यक्त केले होते. दरम्यान, असे असले तरी, अद्याप तरी शिवसेनेकडून युतीबाबत कोणत्याही प्रकारचे वक्तव्य किंवा संकेत भाजपसाठी मिळाले नाहीत. त्यामुळे येत्या काळात दोन्ही पक्ष काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (हेही वाचा, राम मंदिर: ... तर मोदी सरकार खाली खेचून दाखवा; उद्धव ठाकरेंचा 'आरएसएस'ला टोला)

दरम्यान, आज घडीला मावळ आणि शिरुर मतदारसंघात शिवसेनेचे खासदार आहेत. पण, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपने पावले टाकायला सुरुवात केली आहे. त्यामुळेच भाजपने मावळ आणि शिरुर मतदारसंघात अटल संकल्प महोसंमेलन आयोजित केल्याचा दावा राजकीय वर्तुळातून करण्यात येतो आहे. परंतू, मुख्यमंत्र्यांनी मात्र आपल्या भाषणात या दाव्याचे खंडण करत, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघावर दावा करण्यासाठी अटल संकल्प महासंमेलन नाही असे म्हटले आहे.