लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2019) घवघवीत यश प्राप्त केल्यानंतर सर्वांना उत्सुकता लागली आहे ती विधानसभा निवडणूकींची (Assembly Election 2019). राज्यात भाजप (BJP) आणि शेवसेनेच्या (Shivsena) युतीने फार मोठी कामगिरी करून दाखवली, त्यानंतर विधासभा निवडणुकाही दोघे एकत्र लढवणार असल्याची घोषणाही झाली. मात्र आतापर्यंत याबद्दल काही ठोस माहिती मिळाली नव्हती. आज पहिल्यांदाच चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी जागा वाटपाबद्दल भाष्य केले आहे. महाराष्ट्र विधानसभेतील 288 जागांपैकी भाजप आणि शिवसेना प्रत्येकी 135 जागा लढवणार आहे, तर 18 जागा घटकपक्षांना दिल्या जातील, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
चंद्रकांत पाटील सध्या महाराष्ट्राच्या दुष्काळी दौऱ्यावर आहेत, यावेळी बोलताना त्यांनी या युतीच्या फॉर्म्युल्यावर भाष्य केल. शिवसेना आणि भाजपच्या विधानसभा निवडणुकीत समान जागा लढवतील असे त्यांनी सांगितले. शिवसेना आणि भाजपच्या जागेचा प्रश्न निकाली निघाल्यानंतर आता कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडी किती – किती जागांवर लढणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. लोकसभेच्या 48 जागांपैकी भाजपला 23 तर शिवसेनेला 18 जागा मिळाल्या होत्या. आता हीच युती विधानसभा निवडणुकांत काय कमाल दाखवते ते लवकरच कळेल. (हेही वाचा: आदित्य ठाकरे लढवणार विधानसभा निवडणूक? 'हा' मतदारसंघ निश्चित होण्याची शक्यता; उपमुख्यमंत्री पदासाठीही नाव चर्चेत)
दरम्यान, राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात येणार आहेत. यामध्ये आगामी विधानसभेसाठी रणनिती ठरवली जाणार असल्याचे म्हटले जात आहे. बैठकांमध्ये राज्यभरातील पक्ष आणि जागांचा आढावा घेत मनसे स्वबळावर निवडणूक लढवणार असे बोलले जात आहे.